अहमदनगर ः वरिष्ठ राज्यस्तरीय गादी, माती अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा (अधिवेशन) व महाराष्ट्र केसरी किताब लढत 2023 स्पर्धेसाठी केडगाव येथे झालेल्या जिल्हा निवड चाचणी स्पर्धेत महाराष्ट्र केसरीच्या खुल्या वजन गटात सुदर्शन कोतकर (गादी) व युवराज चव्हाण (माती) या दोन्ही मल्लांनी विजय मिळवून दोन किलो चांदीची गटा पटकावली. सायंकाळच्या सत्रात विविध वजन गटातील उपांत्य फेरीच्या तर रात्री उशीरा अंतिम फेरीच्या कुस्त्या पार पडल्या. या मधील विजेते मल्ल महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या वतीने धाराशिव (उस्मानाबाद) येथे 66 वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत अहमदनगर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
केडगाव येथील नवरात्र उत्सवाच्या सोहळ्यात कुस्ती स्पर्धेचा थरार रंगला होता. यावेळी पंचक्रोशीतील ग्रामस्थांसह भाविकांनी कुस्ती स्पर्धा पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती. प्रेक्षकांनी गच्च भरलेल्या मैदानात मल्लांच्या शड्डूचा आवाज घुमला. बोल बजरंग बली की जय! चा गजर करीत कुस्तीप्रेमींनी टाळ्यांच्या कडकडाटात मल्लांना दाद दिली. या सोहळ्यासाठी अहमदनगर जिल्हा तालीम संघाचे अध्यक्ष वैभव लांडगे, ज्येष्ठ पैलवान महादेव अण्णा कोतकर, निवड चाचणी स्पर्धेचे आयोजक हर्षवर्धन कोतकर, नगरसेवक संग्राम शेळके, युवराज पठारे, अमोल येवले, संग्राम कोतकर, विजय पठारे, खजिनदार पै. नाना डोंगरे, उपाध्यक्ष दत्तात्रय अडसुरे, कार्याध्यक्ष अजय अजबे, शहराध्यक्ष नामदेव लंगोटे, बाळू भापकर, पाथर्डी तालुकाध्यक्ष पप्पू शिरसाठ, ऋषीकेश कोतकर, महेश लोंढे, विठ्ठल कोतकर, माजी नगरसेवक सुनिल भिंगारे, सुनिल (मामा) कोतकर, बबन मतकर, अभिजीत कोतकर, शरद ठुबे, मनोज मतकर, वैभव कदम, अंगद महारनोर, महेश गाडे, कृष्णा साळवे, बबलू कोतकर, उपमहाराष्ट्र केसरी श्रीधर मुळे, वसंत पवार, पोपट भुजबळ, पोपट शिंदे, संदेश शिंदे, चंद्रकांत कावरे, सुर्यभान नांगरे, सागर गायकवाड, बबन शेळके, विलास चव्हाण, दिलीप झिंजुर्डे, सचिन शिरसाठ आदी उपस्थित होते.
महाराष्ट्र केसरी ओपन गटातील माती विभागाचा अंतिम सामना युवराज चव्हाणविरुध्द मयुर पवार, तर गादी विभागात सुदर्शन कोतकर विरुध्द युवराज कर्डिले यांच्यात झाला. अंतिम सामना तुल्यबळ असलेल्या मल्लांमध्ये रंगला होता. दोन्ही अंतिम सामन्यात चव्हाण व कोतकर यांनी गुणांवर विजय मिळवला. विविध वजन गटात रंगलेल्या कुस्त्यांमध्ये किमी भरणे, भारंदाज, आखडी, मुलतानी आदी डाव टाकून प्रेक्षकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले.
या स्पर्धेसाठी शिवसेनेचे शहर प्रमुख संभाजी कदम, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, युवा सेनेचे विक्रम राठोड, भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष ॲड. अभय आगरकर, महेंद्र (भैय्या) गंधे, महाराष्ट्र केसरी गुलाब बर्डे, उपमहाराष्ट्र केसरी योगेश पवार, पै. विष्णू खोसे, अनिल गुंजाळ, यांच्या हस्ते देखील कुस्त्या लावण्यात आल्या. स्पर्धेचे आकर्षण असलेले लाल मातीतून सिने सृष्टीत गेलेले पै. अमोल लंके उपस्थित होते. तसेच यावेळी उपस्थितांच्या हस्ते बैलगाडा शर्यत व कुस्तीवर आधारलेल्या रांगडा या मराठी चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण करण्यात आले. स्पर्धेचे आयोजक पै. हर्षवर्धन कोतकर यांनी केडगावच्या मातीत आनखी भव्य स्वरुपात मोठी कुस्ती स्पर्धा घेण्याचा मानस व्यक्त केला.
तर मल्ल आणि पंचांवर दोन वर्षांची बंदी!
मान्यता नसलेल्या इतर जिल्हा निवड चाचणी व कुस्ती स्पर्धेत मल्ल आणि पंचांना सहभागी होता येणार नाही. इतर ठिकाणच्या कुस्ती स्पर्धेत मल्ल व पंचांनी सहभाग नोंदवल्यास कारवाई करुन त्यांच्यावर दोन वर्षाची बंदी टाकली जाणार असल्याचे महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद व अहमदनगर जिल्हा तालीम संघाचे जिल्हा तालीम संघाचे अध्यक्ष वैभव लांडगे यांनी केले आहे.
जिल्हा निवड चाचणी स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे
गादी विभाग
57 किलो प्रथम- दीपक पवार (पारनेर), द्वितीय- अभिजीत भाऊसाहेब वाघुले (नेवासा),
61 किलो प्रथम- ऋषिकेश उचाळे (पारनेर), द्वितीय- युवराज वाघ (पाथर्डी),
65 किलो प्रथम- महेश शेळके (नगर), द्वितीय- किरण धनगर (नगर),
70 किलो प्रथम- मयूर तांबे (पारनेर), द्वितीय- कुमार देशमाने (पारनेर),
74 किलो प्रथम- सौरभ गाडे (जामखेड), द्वितीय- सागर ससाणे (कर्जत),
79 किलो प्रथम- ऋतिक माने (कर्जत), द्वितीय- धुळाजी वीरकर (कर्जत),
86 किलो प्रथम- अक्षय घोडके (नगर), द्वितीय- पृथ्वीराज वनवे (जामखेड),
92 किलो प्रथम- ऋषिकेश लांडे (नगर), द्वितीय- अमोल कोरे (कर्जत),
97 किलो प्रथम- चेतन रेपाळे (पारनेर), द्वितीय- घनश्याम वने (राहुरी),
125 खुला गट प्रथम-सुदर्शन कोतकर (नगर), द्वितीय- युवराज कर्डिले (नगर).
माती विभाग
57 किलो प्रथम- संकेत सातारकर (नेवासा), द्वितीय- ओंकार रोडगे (नेवासा),
61 किलो प्रथम- विश्वजीत सुरवसे (कर्जत), द्वितीय- विशाल ठुबे (राहुरी),
65 किलो प्रथम- सचिन मुरकुटे (कर्जत), द्वितीय- लतेश टकले (नेवासा),
70 किलो प्रथम- प्रकाश कार्ले (नगर), द्वितीय- रोहित आजबे (नगर),
74 किलो प्रथम- सौरभ मराठे (नगर), द्वितीय- विकास गोरे (नगर),
79 किलो प्रथम- संदीप लटके (जामखेड), द्वितीय- ऋषिकेश शेळके (कर्जत),
86 किलो प्रथम- किरण जाधव (कर्जत), द्वितीय- आकाश चव्हाण (पारनेर),
92 किलो प्रथम- अनिल लोणारे (पाथर्डी), द्वितीय- मयूर जपे (नगर),
97 किलो प्रथम- अनिल ब्राह्मणे (राहुरी), द्वितीय- प्रतीक खताळ (कर्जत),
125 खुला गट प्रथम- युवराज चव्हाण (नगर), द्वितीय- मयूर पवार (नगर).