अहमदनगर : वरिष्ठ राज्यस्तरीय गादी व माती अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा (अधिवेशन) व महाराष्ट्र केसरी किताब लढत 2023 स्पर्धेसाठी केडगाव देवी रोड येथे रविवारी (दि.22 ऑक्टोबर) जिल्हा निवड चाचणीचे उद्घाटन उत्साहात पार पडले. हलगीच्या निनादात लाल मातीच्या आखाड्यात व गादीवर डावपेचचा थरार रंगला होता. दुपारी या स्पर्धेला प्रारंभ झाले. जिल्ह्यातील नामवंत कुस्ती मल्ल या स्पर्धेत उतरले होते. तर केडगाव ग्रामस्थांसह पंचक्रोशीतील कुस्तीप्रेमींनी कुस्ती पहाण्यासाठी मोठी गर्दी केली होती.
हनुमानजी व छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्यास अभिवादन करुन आखाडा पूजनाने कुस्तीला प्रारंभ करण्यात आले. पाहुण्यांच्या हस्ते कुस्ती लावून जिल्हा निवड चाचणी स्पर्धेचे उद्घाटन झाले. यावेळी अहमदनगर जिल्हा तालीम संघाचे अध्यक्ष पै. वैभव लांडगे, ज्येष्ठ पैलवान महादेव अण्णा कोतकर, निवड चाचणी स्पर्धेचे आयोजक पै. हर्षवर्धन कोतकर, नगरसेवक संग्राम शेळके, युवराज पठारे, अमोल येवले, संग्राम कोतकर, खजिनदार पै. नाना डोंगरे, उपाध्यक्ष दत्तात्रय अडसुरे, कार्याध्यक्ष पै. अजय अजबे, शहराध्यक्ष पै. नामदेव लंगोटे, पै. बाळू भापकर, पाथर्डी तालुकाध्यक्ष पै. पप्पू शिरसाठ, पै. ऋषीकेश कोतकर, पै. महेश लोंढे, विठ्ठल कोतकर, माजी नगरसेवक सुनिल भिंगारे, सुनिल (मामा) कोतकर, बबन मतकर, अभिजीत कोतकर, बबलू कोतकर, उपमहाराष्ट्र केसरी श्रीधर मुळे, पै. वसंत पवार, पोपट भुजबळ, पोपट शिंदे, संदेश शिंदे, चंद्रकांत कावरे, सुर्यभान नांगरे, सागर गायकवाड, बबन शेळके, पै. विलास चव्हाण, पै. विष्णू खोसे, पै. संदीप डोंगरे, दिलीप झिंजुर्डे, सचिन शिरसाठ आदींसह जिल्हा तालीम संघाचे पदाधिकारी, कुस्तीपटू, प्रशिक्षक व केडगावचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वैभव लांडगे म्हणाले, महाराष्ट्राचे वैभव असलेली कुस्ती स्पर्धेला अहमदनगर जिल्ह्यात चालना देण्याचे काम अहमदनगर जिल्हा तालीम संघ करत आहे. विविध स्पर्धेच्या माध्यमातून कुस्तीपटूंना प्रोत्साहन दिले जात आहे. जिल्ह्याला कुस्ती खेळाचा मोठा वारसा असून, अनेक दिग्गज कुस्तीपटू या जिल्ह्याने महाराष्ट्राला दिले असल्याचे त्यांनी सांगितले.
हर्षवर्धन कोतकर यांनी डिजिटल व मोबाईलच्या युगात कुस्तीचे महत्त्व अबाधित राखण्याचे काम अशा स्पर्धेच्या माध्यमातून होत आहे. केडगावला दोनदा जिल्हा निवड चाचणी स्पर्धा घेण्याचा मान मिळाला. केडगाव हा कुस्तीपटूंसाठी प्रसिध्द असून, अनेक मल्ल या मातीतून पुढे आले आहेत. तर विविध क्षेत्रात कार्यकर्तृत्व गाजवत आहे. कोणतीही महत्त्वकांक्षा न ठेवता खेळाडूंना व खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि मातीतल्या अस्सल खेळाला उर्जितावस्था आणण्यचे काम या स्पर्धेच्या माध्यमातून केले गेले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
निवड चाचणीत जिल्ह्यातील कुस्तीपटूंच्या रंगलेल्या कुस्त्या नागरिकांना अनुभवास मिळाला. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेवतीने धाराशिव (उस्मानाबाद) येथे 66 वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेसाठी अहमदनगर जिल्ह्याचा संघ पाठविण्यासाठी केडगावला दिमाखदार जिल्हा निवड चाचणी स्पर्धा घेण्यात आली. 57, 61, 65, 70, 74, 79, 86, 92, 97 व महाराष्ट्र केसरी 86 ते 125 किलो वजन गटात निवड चाचणी स्पर्धा पार पडली. स्पर्धेसाठी तीनशेपेक्षा जास्त मल्लांचा सहभाग लाभला. महाराष्ट्र केसरी गटातील माती व गादी विभागातील दोन्ही विजयी मल्लांना 2 किलो चांदीची गदा बक्षीस देण्यात येणार आहे. पंच म्हणून संभाजी निकाळजे, हंगेश्वर धायगुडे, गणेश जाधव, संजय डफळ, ईश्वर तोरडमल, शुभम जाधव, नागेश माळी, गणेश शेजुळ यांनी काम पाहिले.