आजपासून शारदीय नवरात्र उत्सव सुरु झाला असून भाविक एकत्र येऊन मोठ्या उत्साहात हा उत्सव साजरा करत असतात. नवनागापूर येथील श्री रेणुकामाता देवी मंदिर हे प्राचीन काळातील स्वयंभू देवी मातेचे मंदिर असून याला धार्मिकतेचे खूप महत्व प्राप्त झाले आहे. हे मंदिर माहूर गड देवीचे स्थान असून भाविकांचे श्रद्धास्थान आहे. सण उत्सव, धार्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरे करावे, जेणेकरून आजच्या युवा पिढीला त्याचा आदर्श घेता येईल. श्री रेणुकामाता देवी मंदिर ट्रस्टने येणाऱ्या भाविकांसाठी विविध सुविधा उपलब्ध करून दिल्याने भाविक भक्तांची गैरसोय होणार नाही. ट्रस्टने नवरात्र उत्सवानिमित्त केलेले नियोजन हे उत्तम असल्याचे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.
नवरात्र उत्सवानिमित्त नवनागापूर येथील श्री रेणुकामाता देवी मंदिरात आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते घटस्थापना करून महाआरती करण्यात आली. यावेळी मनपा विरोधी पक्षनेते संपत बारस्कर, नगरसेवक राजेश कातोरे, रेणुकामाता देवस्थानचे अध्यक्ष प्रभाकर भोर, उपाध्यक्ष साहेबराव भोर, सचिव दत्तात्रय विटेकर, खजिनदार एकनाथ वाघ, विश्वस्त गोरख कातोरे, राजू भोर, विष्णू भोर, किरण सप्रे, गणेश कातोरे, महेश सप्रे, सचिन कोतकर, बाळासाहेब जगताप आदी उपस्थित होते. यावेळी रेणुकामाता देवी मंदिर परिसरात आमदार संग्राम जगताप यांनी उपलब्ध करून दिलेल्या हायमॅक्स दिव्यांचे उदघाटन करण्यात आले दरम्यान मंदिर ट्रस्टवतीने आमदार संग्राम जगताप आणि मनपा विरोधी पक्षनेते संपत बारस्कर यांचा सत्कार करण्यात आला
रेणुकामाता देवस्थानचे अध्यक्ष प्रभाकर भोर यांनी सांगितले की, आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते घटस्थापना महाआरती करून नवरात्र उत्सवाला सुरुवात करण्यात आली. यावेळी पारंपरिक मिरवणूक काढण्यात आली. नवरात्र उत्सवानिमित्त रेणुकामाता देवी मंदिरात आकर्षक सजावट, विद्युत रोषणाई करण्यात आली असून भाविकांसाठी दर्शनासाठी योग्य दर्शनबारीची व्यवस्था, सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना करण्यात आल्या आहे. तसेच या मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर आकर्षित कारंजा उभारण्यात आला आहे, तसेच या ठिकाणी नऊ दिवस विविध धार्मिक तसेच सामाजिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले.