भारतीय जनत पक्षाचे (Bjp) अहमदनगर (Ahmednagar Political) दक्षिण मतदार संघाचे खासदार डाॅ. सुजय विखे यांनी अजित पवार गटाचे नेते तथा माजी आमदार अरुण जगताप यांना माेठी ऑफर दिली आहे. अरुण जगताप यांनी भाजपमध्ये यावे, अशी ऑफर त्यांनी शब्दगंध साहित्य परिषदेच्या 15 व्या राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून दिली आहे. खासदार विखे यांची ही ऑफर म्हणजे, थेट अजित पवार (Ajit pawar) गटाला आव्हान असल्याचे बाेलले जात आहे.
शब्दगंध साहित्य परिषदेच्या 15 व्या राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलनाचा आज समाराेप झाला. या कार्यक्रमात बाेलताना ही जाहीर ऑफर माजी आमदार अरुण जगताप यांना दिली आहे. मात्र या ऑफर देण्यामागे विखे यांनी अरुण जगताप यांचे पुत्र आमदार संग्राम जगताप यांना हा हात दिल्याची चर्चा रंगली आहे. विखे यांनी ही जाहीर ऑफर देताना संग्राम जगताप यांचे सासरे भाजपचे माजी आमदार तथा अहमदनगर जिल्हा सहकारी बॅंकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले हे देखील व्यासपीठावर उपस्थित हाेते. त्यामुळे विखे यांच्या या ऑफरची चर्चा अहमदनगरमध्ये रंगली असून, त्याचे दूरगामी राजकीय परिणाम हाेणार असल्याचे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे.
अहमदनगर (Ahmednagar) शहरातील गंगाधर शास्त्री गुणे आयुर्वेद महाविद्यालयाच्या प्रांगणात गेल्या दोन दिवसांपासून आयोजित करण्यात आलेल्या 15 व्या राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलनाचा आज उत्साहात समारोप झाला. संमेलनाध्यक्ष डॉ. पुरुषोत्तम भापकर, स्वागताध्यक्ष आमदार संग्राम जगताप (Sangarm jagtap), माजी आमदार अरुण जगताप, माजी मंत्री शिवाजी कर्डिले, भीमराज धोंडे, नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक बी.जी. शेखर पाटील, डॉ. एस.एस.दीपक, उपमहापौर गणेश भोसले, मनपा स्थायी समितीचे सभापती गणेश कवडे, माजी कुलगुरु डॉ. सर्जेराव निमसे, प्राचार्य शिवाजीराव देवढे, शब्दगंधचे अध्यक्ष राजेंद्र उदागे, सुनील गोसावी, भगवान राऊत, विनीत पाऊलबुधे, धनंजय जाधव, बाळासाहेब पवार, बाबा अरगडे, आरिफ शेख, ज्ञानदेव पांडुळे उपस्थितीत होते.
खासदार विखे म्हणाले, “अहमदनगर जिल्ह्याच्या उत्तरेत साहित्य चळवळ गेली अनेक वर्षे कार्यरत आहे. दक्षिणेत मात्र, ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्यानंतर आमदार संग्राम जगताप यांनी या चळवळीला पाठबळ देत आहे. ही चांगली गाेष्ट आहे. येणाऱ्या काळात देखील जगताप यांनी ही चळवळ पुढे न्यावी”. जगताप यांनी अचानक साहित्याकडे वळणे हा महायुतीचाच परिणाम अशी टिप्पणी करत अरुणकाका तुम्ही भाजपमध्ये या, अशी ऑफर देखील यावेळी खासदार विखे यांनी यावेळी दिली. अहमदनगर शहरात लवकरच 25 काेटी रुपयांचे अद्यावत असे ग्रंथालय उभारणार असल्याची घाेषणा खासदार विखे यांनी यावेळी केली.
बी. जी शेखर पाटील यांनी अहमदनगर जिल्ह्याला साहित्य आणि संस्कृतीचा मोठा वारसा आहे. येथील साहित्य चवळीत कार्यरत असलेले मान्यवर हा वारसा पुढे नेत आहेत. प्रत्येकामध्ये साहित्यिक असतो,. ते समोर येणे गरजेचे आहे, असे सांगितले. घनश्याम शेलार, डॉ. सर्जेराव निमसे यांनीही मनोगत व्यक्त केले. संमेलनाध्यक्ष डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी सुसंस्कारित पिढी निर्माण होण्यासाठी समाजाला सकारात्मक विचारांची गरज असल्याचे म्हटले.
स्वागताध्यक्ष आमदार संग्राम जगताप यांनी शब्दगंध साहित्य संमेलनाच्या माध्यमातून साहित्य चळवळीला प्रोत्साहन मिळाले आहे. साहित्यिकांच्या माध्यमातून सकारात्मक विचाराची देवाणघेवाण होत असते. त्या माध्यमातून युवा पिढी लेखनाकडे वळेल आयुर्वेद महाविद्यालयाला शंभर वर्षांची परंपरा आहे. (कै.) गंगाधर शास्त्री गुणे यांनी आयुर्वेद महाविद्यालयाची स्थापना केली. या ठिकाणी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी यांनी येथे येऊन उपचार घेतले आहे. या महाविद्यालयाच्या माध्यमातून लाखो विद्यार्थी घडले आहे. त्या माध्यमातून समाज सुधारण्याचे काम होत आहे, असे ते म्हणाले.
शब्दगंधचे संस्थापक सुनील गोसावी यांनी प्रास्ताविक केले. शर्मिला गोसावी यांनी सूत्रसंचालन केले.