शिरपूर-पुणे बसचे चालक व्ही. एम. राठोड आणि वाहक आर. ए. गवळी (शिरपूर आगार) (Ahmednagar-Pune) यांनी प्रामाणिकता दाखवत पैश्यानं भरलेली व महत्त्वाचे कागदपत्र असलेली बॅग अहमदनगरमधील प्रवासी शकिल खान यांना परत केली. एसटीच्या चालक-वाहकानं दाखवलेल्या प्रामाणिकपणाचं कौतुक व त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
शिरपूर-पुणे या बसमध्ये शहरातील शकिल खान (रा. मुकुंदनगर, अहमदनगर) यांनी कोल्हार ते तारकपूर असा 6 ऑक्टोबरला प्रवास केला. गडबडीमध्ये त्यांच्या जवळ असलेली बॅग एसटी बसमध्येच राहिली. या बॅगेत 50 हजाराची रोख रक्कम, महत्त्वाचे कागदपत्रे होते. प्रवास करुन ही बस पुढे पुणे इथं शिवाजीनगर बस स्थानकात पाेहचली. वाहकाला ही बॅग नजरेत पडल्याने, कोणत्या तरी प्रवाश्याची बस एसटीत राहिल्याचे लक्षात आलं. चालक व वाहकांनी बॅग तपासली असता यामध्ये पैसे व कागदपत्र आढळली. तर बॅगेत एक ओळखत्र व त्यावर मोबाईल क्रमांक असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी त्या क्रमांकावर संपर्क केला.
बॅगेचा शोध घेणारे खान यांचा फोन करून चालक व वाहकांनी बॅग व त्यातील पैसे सर्व व्यवस्थित असल्याची माहिती दिली. खान यांना ही माहिती फाेनवरून समाजताच सुटकेचा निःश्वास सोडला. एसटीने दुसऱ्या दिवशी परतीचा प्रवास करताना चालक व्ही. एम. राठोड व वाहक आर. ए. गवळी यांनी खान यांना तारकपूर आगारात बोलावून त्यांच्याकडे सदरची विसरलेली बॅग सुपूर्द केली. हा प्रामाणिकपणा पाहून खान यांच्यासह उपस्थित सर्वच भारावले. खान यांनी समाधान व्यक्त करुन एसटी महामंडळामध्ये असलेल्या प्रमाणिकपणाचे अभिनंदन केले. यावेळी वाहतूक निरीक्षक श्रीमती भांड, वाहतूक नियंत्रक एस.बी. शितोळे उपस्थित होते.