अयोध्येतील श्रीराम मंदिर पूर्णत्वास येत आहे. याचा आनंद सर्व जनतेला होत आहे. या आनंदात भर घालण्यासाठी महाकवी ग.दि.माडगूळकर व थोर गायक सुधीर फडके यांनी अजरामर केलेले ‘गीतरामायण’ प्रसिद्ध गायक व संगीतकार श्रीधर फडके यांच्या अमृतमय वाणीतून ऐकण्याची संधी अहमदनगरच्या (Ahmednagar) रसिक श्रोत्यांना मिळणार आहे. सोमवारी, ९ ऑक्टोबरला सायंकाळी सहा ते रात्री नऊ यावेळी यशवंतराव सहकार सभागृह इथं ‘भावसुमनांजली’ हा गीतरामायण व भावगीतांचा मिलाफ असलेल्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी मोफत खुला आहे, अशी माहिती कार्याक्रमचे संयोजक लेखक सुहास मुळे यांनी दिली.
या कार्यक्रमाच्या पूर्वार्धात अहमदनगरचे निवडक 13 स्थानिक गायक कारओके गाण्याच्या प्रकारात गायक सुधीर फडके यांची भावगीते सादर करणार आहेत. उत्तरार्धात गायक व संगीतकार श्रीधर फडके गीतरामायण सादर करणार आहेत. यावेळी नगरकरांच्या वतीने ज्येष्ठ गायक व संगीतकार श्रीधर फडके यांना जुन्या काळातील ग्रामोफोनच्या रेकॉर्डची चांदीची प्रतिकृती देवून त्यांच्या गायन साधनेचा गौरव करण्यात येणार आहे. सर्वांसाठी मोफत असलेल्या या कार्यक्रमात नगरच्या स्थानिक कलाकारांना व स्व.गदिमा व बापुजींचे गीतरामायण ऐकण्याची सुवर्ण संधी नगरकरांना मिळणार असल्याने मोठ्या संख्यने रसिक श्रोत्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.
अहमदनगरमध्ये (Ahmednagar) अनेक गुणवत्ता पूर्ण गायक, वादक व कलाकार आहेत. मात्र संधी न मिळाल्याने अद्याप ते समाजाच्या पुढे आले नाहीत. अशांना संधी मिळावी यासाठी गेल्या दोन वर्षांपासून शहरात विविध उपक्रम राबवत आहे, असे संयोजक सुहास मुळे यांनी सांगितले. ‘भावसुमनांजली’ कार्यक्रमात अहमदनगरचे स्थानिक कलाकार आराधना गायकवाड, डॉ. शैलेंद्र खंडागळे, रामनाथ गव्हाणे, किरण खोडे, दिनेश मंजरथकर, सुनील भंडारी, विद्या तनवर, संजय माळवदे, रेणुका पवार, सुनील हळगावकर, प्रशांत छजलानी, प्रकाश भळगट व संतोष पानसरे आदी भावगीते सादर करणार आहेत. प्रसिद्ध निवेदिका चारु शिवकुमार सूत्रसंचालन करणार आहेत.