राष्ट्रवादीचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी समाज माध्यमांद्वारे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्यावर टीका केली हाेती. अण्णांवर टीका केल्यानं त्याचे पडसाद राज्यसह देशात उमटले. अहमदनगरमध्ये देखील त्याच्या प्रतिक्रिया उमटले. अण्णा हजारे या टीकेला काेणत्या पद्धतीने उत्तर देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले हाेते. आपली बदनामी केल्याप्रकरणी आपण जितेंद्र आव्हाड यांच्याविराेधात दावा दाखल करणार असल्याचे अण्णा हजारे यांनी म्हटले आहे.
आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ‘एक्स’वर (पूर्वीचे ट्विटर) पाेस्ट टाकत अण्णा हजारे यांचा फाेटाे त्याखाली लावला हाेता. पाेस्टमध्ये ‘ह्या माणसाने ह्या देशाचे वाटाेळे केले. टाेपी घातली म्हणजे, कुणी गांधी हाेत नाही’, असे लिहिले हाेते. या पाेस्टखाली फॉलोअर्सनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. या प्रतिक्रियांची चर्चा राज्यभर हाेती.
अण्णा हजारे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, माझ्या आंदाेलनामुळे देशातील नागरिकांचे भले झाले. मात्र त्यांच्या काही कार्यकर्त्यांना दूर राहावे लागले. याची खंत त्यांच्या मनात असावी. यावर वकिलांशी चर्चा करून आव्हाड यांच्याविरुद्ध अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार आहे.
‘इंडिया अगेन्स्ट करप्शन’, नावाच्या संघटनेच्या खाली आज बारा वर्षापूर्वी काॅंग्रेस सरकारच्या भ्रष्टाचाराविराेधात रान उठवण्यात आले हाेते. भाजप सरकार यानंतर सत्तेत आले. भाजपला आता सत्तेत येऊन दहा वर्षे झाली आहे. परंतु अण्णांनी त्यांच्याविराेधात एकही आंदाेलन केले नाही. यावर समाज माध्यमांतून प्रतिक्रिया उमटत आहेत.