Solapur : राष्ट्रीय समाज पक्षाच अध्यक्ष तथा माजी मंत्री महादेव जानकर यांच्यासमाेर राज्याचे कुलदैवत असलेल्या मंदिरात संतापजनक प्रकार झाला आहे. महादेव जानकर यांना तुळजाभवानी देवीच्या गाभाऱ्यात जाण्यापासून राेखल्याचा प्रकार झाला आहे. त्यामुळे महादेव जानकर यांनी प्रचंडी नाराजी व्यक्त केली आहे.
राष्ट्रीय समाज पक्षाची जनस्वराज्य यात्रेची आज बुधवारी तुळजाभवानी देवीच्या आरतीने सुरूवात झाली. यासाठी महादेव जानकर हे तुळजा भावनीच्या दर्शनासाठी मंदिराच्या गाभाऱ्यात गेले हाेते. त्यावेळी त्यांना तिथे सुरक्षा रक्षकांनी अडवले. यावर महादेव जानकर यांनी चांगलाच संताप व्यक्त करत गाभाऱ्याच्या बाहेरूनच देवीचे दर्शन घेतले. देवीच्या गाभाऱ्यातून दर्शन न मिळाल्याने महादेव जानकर यांनी तुळजाभवानी मंदिर प्रशासनाच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली. तुळजाभवानी प्रशासनाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी यांच्याशी लवकरच यावर चर्चा करणार असल्याचे महादेव जानकर यांनी सांगितले.
दरम्यान, तुळजाभावनी मंदिर संस्थानचे व्यवस्थापक तथा तहसीलदार साेमनाथ माळी यांनी यावर खुलासा केला आहे. महादेव जानकर आले त्यावेळी अभिषेक पूजा संपलेली हाेती. तसेच आरतीही सुरू हाेती. आरती सुरू असताना पुजाऱ्याशिवाय काेणालाच गाभाऱ्यात प्रवेश दिला जात नाही किंवा साेडले जात नाही, असे साेमनाथ माळी यांनी सांगितले आहे.
तुळजाभावनी प्रशासनाकडून यापूर्वी संभाजीराजे छत्रपती यांना देवीच्या गाभाऱ्यात जाण्यापासून राेखण्याचा प्रकार झाला हाेता. त्यावेळी राज्यात माेठा गदाराेळ झाला हाेता. आता महादेव जानकर यांच्याबाबत असाच प्रकार झाला आहे. त्यामुळे तुळजा भवानी मंदिर प्रशासनाभाेवती वाद वाढत चालला आहे.