चीनमध्ये हँग जुई इथं सुरू असलेल्या 19व्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी अहमदनगरच्या आदित्य संजय धोपावकर याची भारतीय कुराश संघात निवड झाली आहे. आशियाई स्पर्धेत सहभागी होणारा तो अहमदनगरचा वैयक्तिक खेळातील एकमेव खेळाडू आहे.
हाँगजुई इथं 23 सप्टेंबरपासून आशियाई स्पर्धा सुरू झाल्या आहेत. भारताने 45 क्रीडा प्रकारात 600 खेळाडूंनी भाग घेतला आहे. कुराश या खेळाचा या स्पर्धेत समावेश आहे. आदित्य हा 81 किलो वजन गटात भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. त्याच्यासह भारतीय संघात तीन मुलं, तीन मुलींचा समावेश आहे. दिल्ली व भोपाळ येथे झालेल्या दोन निवड चाचणीमधून आदित्यची निवड झाली आह़े.
आदित्यने कुराश व जुदो या खेळांमध्ये तीसहून अधिक राष्ट्रीय स्पर्धांमध्ये पदके जिंकलेली आहेत. कुराश या खेळात तीन आशियाई आणि एक जागतिक अश्या चार आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होताना आदित्यने दोन रौप्य पदके जिंकली आहेत. तर बाकी स्पर्धेत त्याने पाचवा क्रमांक मिळवला आहे. आदित्य हा 2012 पासून यंग मेन्स असोसिएशनच्या सिद्धीबाग ज्यूदो हॉलमध्ये कुराश व ज्युदोचा सराव करतो. त्याला राष्ट्रीय कीर्तीचे क्रीडा मार्गदर्शक त्याचे वडील प्रा. संजय धोपावकर यांचे मार्गदर्शन लाभले.
कुराश असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष व कुराश असोसिएशन ऑफ इंडियाचे खजिनदार अंकुश नागर यांनी आदित्यला शुभेच्छा दिल्या आहेत. आदित्य हा चीनला 27 सप्टेंबरला रवाना झाला असून त्याची स्पर्धा 1 ऑक्टोबरला हाेणार आहे.