शेतीमध्ये सातत्याने येणारे अपयश, त्यावरील उपाय योजना या विषयांवर मार्गदर्शन तसेच कमी खर्चात आपल्या शेतीच्या बांधावर खते बनवण्याचे प्रशिक्षण देणारी बायोमी लर्निंग फाऊंडेशनने आयोजित ‘कृषी रसायने साक्षरता कार्यशाळा’ दैठणे गुंजाळ इथं पार पडली. या कार्यशाळेत जळगाव, अमरावती, सातारा, सांगली, कोल्हापूर, औरंगाबाद आणि इतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सहभाग घेतला होता. सप्टेंबर 2022 मध्ये ‘कृषी रसायने साक्षरता कार्यशाळा’ची पहिली बच झाली होती. दर महिन्याला एक याप्रमाणे या कार्यशाळेचे 12 बॅच काल पूर्ण झाल्या. वर्षपूर्ती बॅच निमित्ताने तर मोठा अनपेक्षित मोठा प्रतिसाद मिळाला.
नव्या पद्धतीची आणि कमी खर्चात शुद्ध अन्न-धान्य पुरवणारी शेती पद्धती विकसित होत आहे. त्यात आपण कमी क्षेत्रात जास्तीत जास्त उत्पादन कसे घेऊ शकतो आणि शेतीमालाला भाव नसला तरीही शेती कशी फायदेशीर ठेवता येऊ शकते, याबद्दल बायोमी टेक्नोलॉजीज या संस्थेचे प्रमुख शास्रज्ञ डॉ. प्रफुल्ल गाडगे यांनी माहिती दिली. तसेच कृषी रसायने आणि त्याचा सुयोग्य वापर याविषयी त्यांनी अत्यंत मुद्देसूद मार्गदर्शनही केले. यावेळी डॉ गाडगे यांनी अगदी कमी खर्चात आपल्या शेतीच्या बांधावरच जैविक रसायने बनवण्याचे प्रशिक्षण दिले.
देशातील 150 पेक्षा जास्त संस्थांसोबत आणि देशातील अनेक विद्यापीठांसोबत संलग्न काम करणाऱ्या बायोमी टेक्नोलॉजीजच्या प्रयोगशाळेत हे प्रशिक्षण झाले. या कार्यशाळेच्या शेवटी बायोमी टीमने जैविक- एकात्मिक पद्धतीने फायदेशीर हंगाम नियोजन याविषयी शेतकऱ्यांना अनमोल असे मार्गदर्शन करत ट्रायकोडर्मा या आणि अशा इतर अनेक फायदेशीर कृषी रसायनांचे वाटप केले. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ‘द फार्म’ या संस्थेचे सहकार्य मिळाले.