मराठी माणसाची मुंबई असल्याचे म्हटले जाते, तिथेच मराठी मासणाचा अपमान हाेताे, याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हायरल व्हिडिओ समाेर आल्यानंतर राज्यभरात उत्साहात सुरू असलेल्या गणेशाेत्सवाच्या निराेपात देखील संताप व्यक्त केला जात आहे. यानंतर मुलुंड पाेलिस ठाण्यात याप्रकरणी संबंधित गुजराथी पिता-पुत्रांविराेधात गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार मुंबईतल्या तृप्ती देवरुखकर यांच्याबराेबर झाला असून, त्यांनी त्याचा सविस्तर घटनाक्रम समाज माध्यमांवर शेअर केला आहे.
अजितदादांचा इशारा
मुंबईत मराठी माणसाला गुजराती पिता-पुत्रांनी हिणवल्याची दखल राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेत गंभीर इशारा दिला आहे. या प्रकरणातील तथ्य काय आहे, ते तपासून घेऊ. असा प्रकार महाराष्ट्रात सहन केला जाणार नाही. मराठी माणसाचा असा पुन्हा अपमान हाेणार नाही, अशी कठाेर भूमिका आम्ही घेऊ. महाराजांच्या भूमीत असे घडणे ही लाजिरवाणीबाब आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.
तृप्ती देवरुखकर यांना मुंबईतल्या मुलुंड या उपनगरात मराठी असल्याने जागा नाकारण्यात आली. याचा सविस्तर घटनाक्रम त्यांनी समाज माध्यमांवर व्हिडिओ करून शेअर केला आहे. मुलुंड वेस्टमधल्या शिवसदन नावाच्या इमारतीत घर बघण्यासाठी त्या गेल्या हाेत्या. मात्र साेसायटीचे सचिव हे गुजराती आहेत. या सचिवांच्या वडिलांनी महाराष्ट्रीय व्यक्तींना आम्ही घर देत नाही, असे सांगून नकरा दिला. यातून वाद वाढला. देवरुखकर यांनी त्या बाचाबाचीचा व्हिडिओ माेबाईलमध्ये काढला. पण त्यावरून या गुजराती पिता-पुत्राने अरेरावी केली आणि माेबाईल काढून घेतला. त्यांनी आपल्या पतीलाही मारल्याचा दावा तृप्ती यांनी केला आहे.
महिला आयाेगाकडून दखल
तृप्ती यांच्याबराेबर झालेल्या प्रकाराची आणि त्यांनी शेअर केलेल्या व्हिडिआेची दखल महिला आयाेगाने घेतली आहे. याप्रकरणी सहकार आयुक्त, महाराष्ट्र राज्य, पुणे तसेच प्रधान सचिव, गृहनिर्माण विभाग, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई यांना चौकशी करून अहवाल मागवला आहे. चौकशी करून दोषींवर कारवाईचे निर्देश संबंधित पोलिस ठाण्याला दिल्याची माहिती महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिली.
घडला प्रकार तृप्ती यांनी समाज मध्यमांवर शेअर केल्यानंतर मनसेने त्याची दखल घेतली. शिवसदन साेसायटी गाठली. त्यांनी मला त्या साेसयटीत बाेलावून घेतले आणि त्या दाेघांनाही जाब विचारला. त्या दाेघांनी माफी मागितली. आपण मनसे पदाधिकाऱ्यांचे आभारी आहाेत, असेही तृप्ती यांनी व्हिडिओ पुन्हा पाेस्ट करून सांगितले आहे.
तृप्ती यांनी मुलुंड वेस्टमधील शिवसदन साेसायटीत ऑफिससाठी जागा पाहायला गेल्यानंतर गुजराती सचिवने मराठी माणसांना घर देणार नाही, असे सांगितले. नियमावली मागितली तर, धमकी दिली. पाेलिसांना सांगा नाहीतर आणखी कुणाला सांगा, असे सांगत हात पकडला आणि माझ्या पतीला धक्काबुक्की केली. माेबाईलमध्ये शुटींग सुरू केल्यावर माेबाईल काढून घेतला. हा सर्व अनुभव तृप्ती यांनी व्हिडिओमध्ये सांगितला आहे. त्यावेळी त्या रडत हाेत्या.