पाच दशकांपासून अशोक सराफ या नावाची जादू सिनेसृष्टीवर कायम आहे. त्यामुळे राज्य सरकारतर्फे पद्म पुरस्कारासाठी त्यांच्या नावाची शिफारस करणार असल्याची घाेषणा भाजप नेते आणि वन मंत्री सुधीर मुनगंटीवर यांनी केली. महाराष्ट्र कीर्ती साैरभ प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा ‘शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे पुरस्कार’ अशाेक सराफ यांना या कार्यक्रमात प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमात मुनगंटीवार यांनी अशाेक सराफ यांचे नाव पद्म पुरस्कारासाठी शिफारस करणार असल्याची घाेषणा केली.
मुनगंटीवार म्हणाले, “पद्म पुरस्कारासाठी नावाची शिफारस करण्याची जबाबदारी सांस्कृतिक मंत्री म्हणून मुख्यमंत्र्यांनी माझ्यावर साेपावली आहे. तेव्हापासून काेणाचे नाव सुचवावे, असा प्रश्न पडला हाेता. पुरंदरे पुरस्कार वितरण कार्यक्रमाच्या निमित्ताने नावाचा शाेध संपला”. लाेकांच्या हृदयावर राज्य करणे महाकठीण काम, ते अशाेक सराफ यांनी केल्याचेही गाैरवाेद्गार मुनंगटीवार यांनी काढले.
अशाेक सराफ यांचा जन्म चार जून 1947 राेजी मुंबईतील चिखलवाडी इथं झाला. अशाेक सराफ यांच्या वडिलांना त्यांनी शिक्षणानंतर नाेकरी करावी, अशी इच्छा हाेती. पण त्यांच्या ध्यानीमनी फक्त अभिनय हाेता. अशाेक सराफ यांनी शिक्षणानंतर स्टेट बॅंक ऑफ इंडियामध्ये नाेकरी केली. अभिनयाबराेबर त्यांनी दहा वर्षे नाेकरी केली. वि. स. खांडेकर यांच्या ययाति या कादंबरीवर आधारित नाटकात भाग घेतला. यात त्यांनी विदूषकाची भूमिका केली हाेती. या भूमिकेपासून त्यांच्या करिअरला सुरूवात झाली. यानंतर 1971 मध्ये दाेन्ही घरचा पाहूणा या चित्रपटात भूमिका केली. 1975 मध्ये दादा कोंडके यांच्या ‘पांडू हवालदार’ने अशोक सराफ यांना ओळख मिळवून दिली. यानंतर त्यांनी ‘करण अर्जुन’, ‘येस बॉस’, ‘जोरू का गुलाम’ या सिनेमांत काम केले. यानंतर त्यांनी पाच दशके त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले.