“पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी अजित पवार यांना अट घातली आहे. राष्ट्रवादी काॅंग्रेसचे पक्षाध्यक्ष शरद पवार हे भाजपसाेबत आले, तरच तुम्हाला मुख्यमंत्री करू”, असा गाैप्यस्फाेट विराेधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. विजय वडेट्टीवार यांच्या या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा खळबळ उडाली आहे. शरद पवार साेबत आले, तरच अजितदादांना भाजप मुख्यमंत्री करणार आहे. त्यामुळे अजितदाद वारंवार शरद पवार यांची भेट घेऊन त्यांना साेबत येण्याची गळ घालत आहे. दया-याचना करत आहेत, असा दावा विजय वडेट्टीवार यांनी केलाय.
शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पुण्यात गाेपनीय बैठक झाली. या बैठकीमुळे राज्याचे राजकारण चांगलेच ढवळून निघाले. त्यातून महाविकास आघाडीत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत, काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटाेले यांच्याशिवाय मनसेचे राज ठाकरे यांनी या भेटीवर टीका केली आहे. महाविकास आघाडीने या भेटीवर नाराजी व्यक्त केली आहे. अशा भेटी टाळल्या पाहिजेत, असे मत महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून केले जात आहे. यानंतर आता विजय वडेट्टीवार यांनी शरद पवार आणि अजित पवार यांच्या भेटीवर गाैप्यस्फाेट केला आहे.
विजय वडेट्टीवार म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनीच अजित पवार यांना मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिल्याची माहिती आम्हाला मिळाली आहे. शरद पवार यांना भाजपसाेबत आणावेच लागेल, तर तुम्हाला मुख्यमंत्री करू, अशी अटक माेदींनी अजित पवार यांना घातली आहे”. नाहीतर मुख्यमंत्री हाेण्याची स्वप्न ते स्वप्नच राहिल, असे माेदींनी अजित पवार यांना स्पष्ट केले आहे, अशी माहिती मिळाल्याची माहिती विजय वडेट्टीवार यांनी दिली.
अजित पवार यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हायचे आहे. त्यामुळे माेदी यांची अट पूर्ण करण्यासाठी ते वारंवार प्रयत्न करत आहेत. भाजपसाेबत चला, अशी विनवणी ते शरद पवार यांनी करत आहे. शरद पवार म्हणत आहे की, अजित पवार हे माझे पुतणे आहेत. त्यामुळे वडिलकीच्या नात्याने त्यांची भेट घेतली. याच काय चुकीचे आहे? तसेच मी महाविकास आघाडीसाेबत आणि महाविकास आघाडी एकसंघ राहणार आहे, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे. ठाकरे गट आणि काॅंग्रेसने मात्र राष्ट्रवादी साेबत आली नाही, तर भाजपविराेधात लढण्यासाठी बी-प्लॅन तयार ठेवला आहे, असे देखील वृत्त आहे.