भारताचा राष्ट्रध्वज भगवा करण्याच्या मागणीसाठी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे ऊर्फ मनाेहर गुरूजी यांनी आज सांगलीत पदयात्रा काढली. देशाच्या स्वातंत्र्यदिनीच ही पदयात्रा काढल्यामुळे माेठा वाद हाेण्याची शक्यता आहे. भारत हे हिंदू राष्ट्र आहे. त्यामुळे राष्ट्रध्वजही भगवा असावा, असा भिडे यांनी युक्तिवाद केला आहे. या पदयात्रेत संभागी भिडे ऊर्फ मनाेहर गुरूजी यांच्या धारकऱ्यांनी पाकिस्तानविराेधात जाेरदार घाेषणाबाजी केली. विशेष म्हणजे, संभाजी भिडे ऊर्फ मनाेहर गुरूजी यांच्या या पदयात्रेत तिरंगा ध्वज नव्हता.
संभाजी भिडे यांच्या उपस्थितीत स्वातंत्र्यदिनी सांगलीत हिंदवी स्वराज्य स्वातंत्र्यदिन पदयात्रा आज निघाली हाेती. या पदयात्रेत हजाराे युवक सहभागी झाले हाेते. छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अपर्ण करून, भगव्या ध्वजाला हार प्रदान करून प्रेरणा मंत्राने ही पदयात्रेला सुरूवात झाली. पदयात्रेत संभाजी भिडे हे शेवटी एकटेच चालत सहभागी झाले हाेते.
भारत हे हिंदू राष्ट्र आहे. त्यामुळे भारताचा राष्ट्रध्वज भगवा करावा, या प्रमुख मागणीसाठी ही पदयात्रा काढण्यात आली हाेती. भगवा न राष्ट्रध्वज हे उरी शल्य दुःख! कारण राष्ट्रध्वज ही शिव आन भाक! दिल्लीवरी फडकवू भगवा ध्वजाला! ओलांडू म्लेच्छ वधन्या आम्हीं अटकेला !! राजा बदलताे, रामुद्रा बदलते पण ध्वज बदलत नाही. श्री छत्रपती-श्री शंभू छत्रपती महाराजांची अपूर्ण इच्छा आकांक्षा पूर्णत्वाकडे पडणारे पाऊल… भगवा राष्ट्रध्वज असा निर्धार धारकऱ्यांनी व्यक्त केला आहे.
15 ऑगस्टला भारताची फाळणी झाली. त्यामुळे हा भारताचा स्वातंत्र्य दिवस असूनच शकत नाही. या दिवशी फाळणी झाल्याने या दिवशी सर्वांनी उपवास करावे. दुखवटा करावा. जन-गण-मन हे राष्ट्रगीत हाेऊच शकत नाही. रवींद्रनाथ टागोर यांनी जन-गण-मन हे गीत 1898 ला इंग्लंडच्या राजाच्या स्वागतासाठी लिहल्याचा दावा संभाजी भिडे यांचा आहे. संभाजी भिडे यांनी पूर्वीच 14 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला तिरंगा फडकवणार नाही आणि राष्ट्रगीतही म्हणणार नसल्याचे स्पष्ट केले हाेते.