चित्रपटसृष्टीवर शाेककळा पसरणारी बातमी समाेर आली आहे. सुप्रिसद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई (वय 58) यांनी आत्महत्या केल्याचे समाेर आले आहे. कर्जत इथल्या एनडी स्टुडिओमध्ये ते गळफास घेतल्याच्या स्थितीत आढळले. गळफास घेण्याचा कारण अजून समजलेले नाही. मात्र या घटनेमुळे चित्रपटसृष्टीत खळबळ उडाली आहे.
नितीन देसाई यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक हिंदी, मराठी चित्रपटांमध्ये तसेच इतिहासकालीन मालिकांमध्ये कला दिग्दर्शनाचे काम केले आहे. 1987 सालापासून त्यांनी चित्रपटांसाठी कला दिग्दर्शनाचे काम सुरू केले. 2005 मध्ये त्यांनी कर्जतमध्ये एनडी स्टुडिओ उभारला. याच स्टुडिओमध्ये त्यांनी गळफास घेतला.
नितीन देसाई यांनी ‘जोधा अकबर’, ‘हम दिल दे चुके सनम’, ‘माचिस’, ‘देवदास’, ‘लगान’, ‘प्रेम रतन धन पायो’, अशा अनेक हिट चित्रपटांचे त्यांनी कला दिग्दर्शनाचे काम केले हाेते. यासारख्या अनेक चित्रपटांसाठी नितीन देसाईंनी ‘लार्जर दॅन लाईफ’ असे चित्र उभे करण्यात सिंहाचा वाटा होता. याशिवाय अनेक ऐतिहासिक मालिका व महानाट्यांसाठीही नितीन देसाई यांनी उभारलेले सेट प्रचंड चर्चेचा विषय ठरले होते. नितीन देसाई यांना चार वेळा सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शनाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळालाय. याशिवाय त्यांना फिल्म फेअर पुरस्काराने देखील गाैरविण्यात आले आहे.
नितीन देसाई यांनी 2005 साली कर्जत येथे उभारलेल्या एनडी स्टुडिओत भव्य-दिव्य सेट्सची अद्भुत दुनिया सर्वसामान्यांसाठी खुली केली हाेती. नितीन देसाई यांनी संजय लीला भन्साळी, आशुतोष गोवारीकर, राजकुमार हिरानी यांसारख्या मातब्बर दिग्दर्शकांबरोबर काम केले होते. ‘राजा शिवछत्रपती’ या ऐतिहासिक मालिकेबरोबरच ‘बालगंधर्व’ या चित्रपटाची निर्मितीही त्यांनी केली होती.
एनडी स्टुडिओला दोन वर्षांपूर्वी 7 मे रोजी मोठी आग लागली होती. यात माेठे नुकसान झाले हाेते. नितीन देसाई यांना गेल्या दाेन वर्षांपासून आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत हाेता. त्यांनी आत्महत्येचं टोकाचं पाऊल उचलण्यामागे हेच कारण असल्याचे ही सांगितले जात आहे.