देशात द केरल स्टाेरी चित्रपटाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून पसंती मिळत आहे. परंतु या चित्रपटाच्या कथेवरून वाद पेटला आहे. काही जणांनी चित्रपटाला विराेध केला आहे, तर काही जण पाहण्याची विनंती करत आहेत. तामिळनाडूमध्ये चित्रपटावर बंदी घातली आहे. आता ममता बॅनर्जी सरकारने देखील पश्चिम बंगालमध्ये या चित्रपटावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. ‘पश्चिम बंगाल सरकारच्या या निर्णया विराेधात कायदेशीर लढा उभारू’, अशी प्रतिक्रिया चित्रपटाचे निर्माते विपुल शाह यांनी दिली आहे.
विपुल शाह म्हणाले, “चित्रपटाविषयी नेमकी काय अडचण आहे, याबाबत समजलेले नाही. आम्ही कायदेशीर लढाई उभी करू. कायद्याच्या चाैकटीत जे शक्य आहे, ते करायला आम्ही तयार आहाेत. केरळमध्ये हे सर्व घडत असताना केरळ सरकारनं हे थांबवलं नाही. मात्र आता या चित्रपटावर बंदी घातली जात आहे. यावरून या पक्षांची मानसिकता दिसून येते”.
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या, “राज्यात मला शांतता हवी आहे. द्वेष आणि हिसांचार टाळण्यासाठी द केरल स्टाेरी सिनेमावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे”.
पाच मे राेजी प्रदर्शित झालेल्या ‘द केरला स्टाेरी’ चित्रपटाने बाॅक्स ऑफिसवर काही दिवसातच ५० काेटी रुपयांच्या पुढे कमाई केली आहे. अदा शर्मा, याेगिता बिहानी, साेनिया बानी, सिद्धी इदनानी यांनी ‘द केरला स्टाेरी’ चित्रपटात प्रमुख भूमिका साकारल्या आहेत.