प्रेमाचा जांगडगुत्ता गं..
जीव झाला हा खलबत्ता गं…
उखळात खुपसले तोंड प्रिये..
मुसळाचा तुंबळ रट्टा गं..!या कवितेने काॅलेजमधील विद्यार्थ्यांना खळखळून हसवलं. सादरकर्ते हाेते, औरंगाबाद येथील प्रसिद्ध कवी नारायण पुरी. निमित्त हाेते अहमदनगरमधील पेमराज सारडा महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलनाचे. प्रसिद्ध कवी नारायण पुरी मार्गदर्शन करताना म्हणाले, “
आरशात फक्त प्रतिबिंब दिसते, पण कविता साहित्यामधून मनुष्याचे अंतरंग दिसते. कविता या समाजाचे एक्सरे व सिटी स्कॅन आहेत. सातशे वर्षापासून आपल्या आजी, आईसारख्या माय माउल्यांनी जात्याभवती ओव्यांनी कवितेला जिवंत ठेवल्यानेच. आज या कविता आपल्या पर्यत आल्या आहेत. पूर्वी आजी आजोबा, रेडिओने संस्कार केले. पण आता टीव्ही नावाचा डब्बा आपल्या समोर आहे. मग कशे संस्कार होणार?” यासाठी कवी पुरी यांनी त्यांच्या शैलीत सादर केलेल्या ‘प्रेमाचा जांगड गुत्ता’ या कवितेला दाद मिळाली.
पेमराज सारडा महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनात कवी पुरी यांच्या हस्ते हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा व विविध पुरस्कारप्राप्त प्राध्यापकांचा सत्कार करण्यात आला. हिंद सेवा मंडळाचे अध्यक्ष प्रा.शिरीष मोडक अध्यक्षस्थानी हाेते. कार्याध्यक्ष अॅड.अनंत फडणीस, संचालिका प्रा.ज्योती कुलकर्णी, उपाध्यक्ष प्रा.मधुसूदन मुळे, अमृत मुथा, प्राचार्य डॉ.माहेश्वरी गावित, उपप्राचार्य डॉ.मंगला भोसले, प्रबंधक अशोक असेरी, पर्यवेक्षक सुजित कुमावत, प्रा.गिरीष पाखरे, प्रा. डॉ.स्मिता भुसे, स्नेहसंमेलनाच्या कार्याध्यक्षा प्रा.स्वाती रोकडे आदी उपस्थित होते.
कवी नारायण पुरी यांनी आपल्या पहाडी आवाजात ‘काटा’ या कवितेने उपस्थितांना घायाळ केले. तसेच शेतकऱ्यांची व तिरंग्या झेंड्याची तुलना करत कुणब्यानंही लटकून घेतलंय स्वतःला तिरंग्या सारखं… पेपरात बातमी आली, निबंधाला विषय मिळाला, परिसंवादानं बाळसं धरलं, झडतं राहिल्या चर्चा शेतकऱ्याची आत्महत्या की व्यवस्थेने त्याची केलेली हत्या… खरचं स्वातंत्र लटकल्या शिवाय व लटकावल्या शिवाय मिळत नाही, अशी शेतकऱ्याची व्यथा व्यक्त केली. तसेच अनेक विनोदी कविताही सादर केल्या.
प्राचार्य डॉ.माहेश्वरी गावित यांनी महाविद्यालयाच्या प्रगतीचा अहवाल सादर केला. प्रा.स्वाती रोकडे यांनी प्रास्ताविक केले. प्रा.माधुरी दीक्षित, प्रा.प्रकाश जाधव यांनी सूत्रसंचालनकेले. कवी प्रा.शशिकांत शिंदे यांनी परिचय दिला. उपप्राचार्य डॉ.मंगला भोसले यांनी आभार मानले.