चार वर्षे उलटूनही देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या पहाटेच्या शपथविधीचे गुऱ्हाळ सुरूच आहे. या शपथविधीबाबत भाजप नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माेठा गाैप्यस्फाेट केला आहे. वृत्तवाहिन्यांवर तशा बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी या शपथविधीची कल्पना राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना हाेती, असे म्हटले आहे. फडणवीस यांच्या या गाैप्यस्फाेटानंतर राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. फडणवीस यांच्या या गाैप्यस्फाेटावर शरद पवार यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. देवेंद्र हे असत्याच्या मार्गावर असं विधान करती, असे वाटले नाही, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.
भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी पहाटेच्या शपथविधीवर बाेलताना म्हटले आहे की, या शपथविधीबाबत राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना कल्पना हाेती. त्यांच्याशी चर्चा करूनच शपथविधी झाला हाेता. शपथविधीची चर्चा करताना खाते वाटपाबराेबरच महामंडळाच्या वाटपाबाबतही पवारांशी चर्चा झाली हाेती. देवेंद्र फडणवीस यांचा हा व्हिडिआे 18 जानेवारी 2021चा असल्याचा दावा वृत्तवाहिन्यांनी केला आहे.
फडणवीस असे म्हणत आहे की, “निवडणुकीनंतर शिवसेनेबराेबर चर्चा हाेती. बाेलणी एका टप्प्यावर यायची. परंतु त्यातून मार्ग निघत नव्हता. पण शिवसेना अगाेदरपासूनच काॅंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याची माहिती हाेती. तसे त्यांनी जाण्याचे निश्चित केले हाेते. त्यामुळे आम्ही देखील पर्याय शाेधत हाेताे. परंतु दहा ते बारा दिवस यात निघून गेले. काॅंग्रेसबराेबर जाणे शक्यच नव्हते. त्यामुळे आम्ही राष्ट्रवादीबराेबर बाेलणी सुरू केली. तशी ती सुरू हाेताच, राष्ट्रवादीकडून आम्हाला प्रस्ताव आला. आमचीही बाेलणी अंतिम टप्प्यात हाेती”. आता इथे कॅमेरा नाही. त्यामुळे बाेलण्यास काही हरकत नाही, असेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांच्या या गाैप्यस्फाेटावर शरद पवार यांनी त्यांच्या शैलीत टिपणी दिली आहे. “देवेंद्र फडणवीस हे असत्याच्या मार्गावर असे विधान करतील, असे वाटले नव्हते. मला वाटलं देवेंद्र हा सुसंस्कृत माणूस आहे. सभ्य आहेत. असत्याचा आधार घेऊन ते अशाप्रकारचं विधान करतील, असे मला कधीही वाटल नाही”.
शरद पवार यांची ही प्रतिक्रिया आणि देवेंद्र फडणवीस यांचा व्हिडिआे वृत्तवाहिन्यांवर झळकल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी देखील त्यावर प्रतिक्रिया दिली. शरद पवार यांच्या प्रतिक्रियावर बाेलताना फडणवीस म्हणाले, “या शपथविधीबाबत संपूर्ण उत्तर अजित पवार देतील. माध्यमांच्या प्रतिनिधींनी अजित पवार यावर उत्तर देत नाहीत, असे सांगितल्यावर फडणवीस म्हणाले, त्यांनी त्यावर, म्हणजेच अजित पवारांनी उत्तर दिल्यावर त्यांचे उत्तर अधिकपणे मी पूर्ण करेल”.