“Sweep Master” Award ः अहमदनगर-शिर्डी लोकसभा मतदारसंघातील लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदारांनी 100 % मतदानाची भूमिका बजवावी, त्याचबरोबर मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी व मतदारांमध्ये जनजागृती होण्यासाठी स्वीप नोडल अधिकारी तथा शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांच्या संकल्पनेतून नगर जिल्हा स्वीप समितीवतीने स्वीप मास्टर पुरस्काराचे आयोजन करण्यात आले. व्यक्ती, संस्था , विविध कार्यालये, शाळा/महाविद्यालये यांना प्रस्ताव पाठवण्याचे आवाहन स्वीप समितीच्या माध्यमातून करण्यात आले आहे.
जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी या निवडणुकीत 100 टक्के मतदान घडविण्याचा संकल्प केला आहे. सक्षम मतदार, दिव्यांग मतदार, वंचित महिला घटक मतदार, तृतीयपंथी मतदार, ईव्हीएम व्हीव्हीपॅट विषयक जनजागृती, 85+ मतदार जनजागृती, 2019 मध्ये कमी मतदानाची टक्केवारी असलेल्या क्षेत्रातील केलेल्या मतदार जनजागृतीच्या उपाययोजना,पोस्टल बॅलेट मतदान,टपाली मतदान,विना मोबदला मतदान,शंभर टक्के मतदान,नवमतदार युवक-युवतींचा सहभाग या विविध विषयांवर स्वीप उपक्रम अपेक्षित आहेत.
यानिमित्ताने विविध प्रकारच्या स्पर्धांचे आयोजन(निबंध , चित्रकला , रांगोळी ,पथनाट्य , मतदार जनजागृती गीत निर्मिती, मेहंदी, पोस्टर ,घोषवाक्य , व्हिडिओ/ रील बनवा आदी स्पर्धा) रॅलीचे आयोजन,मतदान करण्याची शपथ घेणे , सार्वजनिक ठिकाणे-सभा संमेलने आदी ठिकाणी मतदान जनजागृती करणे , स्वतःच्या सोशल मीडियाचा वापर मतदार जनजागृतीसाठी करणे यासंबंधी संकल्पना अपेक्षित आहेत.सर्व उपक्रमांमध्ये आदर्श आचारसंहितेचे पालन करणे आवश्यक आहे.
सहभागी होणाऱ्या घटकांनी आपला प्रस्ताव कामाचा तपशील , छायाचित्रे,वृत्तपत्र कात्रणे, प्रमाणपत्रे, प्रशस्तीपत्रे आदींच्या एका झेरॉक्स प्रतीमध्ये स्वतःचे/संस्थेचे/ कार्यालयाचे/शाळा महाविद्यालयाचे संपूर्ण नाव, पत्ता, मोबाईल नंबरसह 10 मे 2024 पर्यंत जिल्हा परिषद,माध्यमिक शिक्षण विभाग,जुन्या बसस्थानकासमोर माळीवाडा, मु.पो.ता.ज़ि.अहमदनगर- 414001 या ठिकाणी समक्ष /पोस्टाने/कुरिअरद्वारे जमा करावयाचे आहे. अधिक माहितीसाठी डॉ.अमोल बागुल (जिल्हा मतदारदूत) यांच्याशी 9595545555 या क्रमांकावर संपर्क साधावा.SVEEP- ” स्वीप ” या शब्दाचा अर्थ Systematic Voter’s Education and Electoral Participation म्हणजेच निवडणूक-मतदान प्रक्रियेत मतदारांचे पद्धतशीर शिक्षण आणि निवडणूक सहभाग असा अर्थ होतो.
जास्तीत जास्त व्यक्ती संस्था व कार्यालये यांनी स्वीप मास्टर पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठवावेत, असे आवाहन जिल्हा निवडणूक शाखेचे उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांनी केले आहे. तसेच उपशिक्षणाधिकारी मीना शिवगुंडे, आकाश दरेकर, तहसीलदार प्रदीप पाटील, उपशिक्षणाधिकारी बाळासाहेब बुगे, निवडणूक नायब तहसीलदार प्रशांत गोसावी आणि सर्व स्वीप समिती सदस्य हा उपक्रम यशस्वीतेसाठी कार्यरत राहतील.