Vaishno Devi Darshan ः अहमदनगरच्या टाकळीमिया (ता. राहुरी) येथील रामदास जाधव आणि सतीश मोरे या दोघांनी टाकळीमिया ते वैष्णोदेवी हा पाच हजार 500 किलोमीटरचा प्रवास 13 दिवसांत पूर्ण केला. दुचाकीवरून वैष्णोदेवीचा सुखरूप केलेल्या प्रवासाचे गावासह राहुरी तालुक्यातून कौतुक होत आहे.
रामदास जाधव म्हणाले, “माझे वडील भीमराज जाधव यांनी 1971, 1982 व 1985 यावर्षी काशी, वाराणसी, ऋषिकेश, वैष्णोदेवी, पुष्कर या तीर्थस्थानी सायकलवरुन प्रवास केलेला आहे. मी देखील गेल्या 30-32 वर्षांपासून दरवर्षी इतर साधनांनी वैष्णोदेवी दर्शनास जात आहे. आपले वडील सायकलवरुन जात होते. याचीच प्रेरणा घेऊन मोटारसायकलवरून आपण सुद्धा जाऊ, असा निश्चय केला. या निश्चयाला मित्र सतीश मोरे यांची साथ मिळाली”. पाच एप्रिलपासून सकाळी निघून दररोज सुमारे 300 ते 400 किलोमीटर प्रवास करत शिर्डी, मालेगाव, धुळे, इंदोर, देवास ग्वाल्हेर, आग्रा, नोएडा, दिल्ली, सोनिपत, पानिपत, अंबाला, पठाणकोट, जम्मू आणि वैष्णवदेवी येथे पोहोचलो. वैष्णव देवीचे दर्शन घेताना वेगळीच अनुभूती जाणवल्याचे रामदास जाधव यांनी सांगितले.
परतीचा प्रवास सुरू केल्यानंतर पठाणकोट, वाघाबॉर्डर, अमृतसर, भटिंडा, फरिदाबाद, हनुमानगढी, बिकानेर, जुनागड, जैसलमेर, नागौर, अजमेर, पुष्कर नसिराबाद, भिलवाडा, चितोडगड, कोटा, रतलाम, शेंदवा, शिरपूर, धुळे व शिर्डीमार्गे टाकळीमिया हा सुमारे साडेपाच हजार किलोमीटर प्रवास करून १७ एप्रिलला रात्री घरी पोहचल्याचे रामदास जाधव यांनी सांगितले.
या प्रवासादरम्यान अनुभव कथन करताना जाधव यांनी मोटारसायकल असल्याने शहरे तसेच काही लहान गावे लागली. प्रत्येक राज्यांच्या चालीरीती, माणसांचे स्वभाव, त्यांचे बोलणे हे लक्षात आले. रस्त्याने अनेकजण भेटले. त्यांनी आपुलकी दाखवून काहींनी जेवण दिले, तर काहीनी गाडीत पेट्रोलसाठी पैसेही दिले. राजस्थान हा गरीब प्रांत असला तरीही येथील माणसांमध्ये फारच आपुलकी व प्रेम भावना दिसून आल्याचे रामदास जाधव यांनी सांगितले.