Ahmednagar News ः “राज्यात लोकसभेची निवडणूक होत असतांना, ओबीसी समाजाच्या नेत्यांवर अशा प्रकारे बहिष्कार टाकण्याचे षडयंत्र आखले जात आहे. यामुळे जे लोक याप्रवृत्ती मागे आहे. त्यांच्या विरोधात राज्यातील ओबीसी समाजाच्या तीव्र भावना आहे. आम्हीही या अशा घटनेचे निषेध करुन ओबीसी नेते छगनराव भुजबळ यांच्या मागे उभे आहोत. राज्यभर या घटनेने पडसाद उमटल्याशिवाय राहणार नाही”, असा इशारा माजी सनदी अधिकारी दिलीपराव खेडकर यांनी दिला आहे.
ओबीसीचे नेते छगनराव भुजबळ यांच्या उमेदवारीबाबत विरोध करणार्यांचा ओबीसी बहुजन आघाडीच्यावतीने माजी सनदी अधिकारी दिलीपराव खेडकर यांच्या नेतृत्वाखाली नगरमध्ये निषेध व्यक्त करण्यात आला. याप्रसंगी वामनराव भदे, राजेंद्र कोथिंबीरे, प्रसाद गाडेकर, बंडू कोथिंबीरे, आकाश वारे, संजय बेद्रे, एकनाथ खेडकर, आदिनाथ दहिफळे, नवनाथ खेडकर आदी उपस्थित होते.
दिलीपराव खेडकर म्हणाले, “आज ओबीसी समाजावर अन्याय होत आहे, त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे ओबीसींचे मजबूत संघटन राज्यात केले जात आहे. सध्याच्या लोकसभा निवडणुकीतही ओबीसींना डावल्याचा प्रयत्न झाला”. त्यामुळे आम्ही स्वतंत्र उमेदवार उभे केले आहेत. त्याचबरोबर ज्या-ज्या ठिकाणी ओबीसी उमेदवार आहे, त्यांना सहकार्य करणार असल्याचे सांगितले.
राज्यासह देशात ओबीसीचे मोठे संघटन छगनराव भुजबळ यांनी उभे केले. ओबीसींवर ज्या-ज्या वेळी अन्याय झाला, त्या-त्या वेळी छगनराव भुजबळ यांनी पदाची तमा न बाळगता ओबीसींच्या हक्कासाठी खंबीरपणे त्यांच्या मागे उभे राहिले. प्रसंगी सरकारच्या विरोधातही भुमिका घेतली. अशा राज्यातील सर्व पक्ष, घटकांतील ओबीसींसाठी काम करणार्या छगनराव भुजबळ यांना नाशिकमधून लोकसभेची उमेदवारी देण्याची दिल्लीमधून चर्चा होती. परंतु काही लोकांनी या ओबीसी नेत्याला विरोध दर्शविणे ही निषेधार्थ बाब आहे. नगरमधील अनेक पदाधिकार्यांनी ओबीसी नेते छगनराव भुजबळ यांच्या उमेदवारीला विरोध करणार्यांचा तीव्र शब्दात निषेध करुन या निवडणुकीतून ओबीसींची ताकद दाखवून देऊ, असे सांगितले.