Ahmednagar Police ः आदिवासीच्या नावाने जमिनीची बेकायदा खरेदी-विक्री केल्याच्या आरोपावरून दाखल गुन्ह्यात आरोपींनी न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली आहे. आरोपी जामिनासाठी धावपळ करत असताना, पोलिसांना मात्र ते सापडत नाही, याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. सुप्रसिद्ध उद्योजक नरेंद्र फिरोदियासह पाच जणांच्या अटकपूर्व जामिनावर 22 एप्रिलला सुनावणी होणार आहे.
नगर शहरातील बोल्हेगाव इथल्या आदिवासींची जमीन बेकायदा खरेदी करून त्याची विक्री केल्याच्या आरोपावरून न्यायालयाच्या आदेशानुसार एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. या अहमदनगर शहरातील बांधकाम व्यावसायिक, व्यापारी, उद्योजक, सरकारी कर्मचारी, अशा एकूण 13 जणांविरुद्ध फसवणूक, कटकारस्थान करून बनावट कागदपत्रे तयार केल्याचा, तसेच अनुसूचित जाती-जमाती प्रतिबंध कायद्यानुसार (अॅट्रोसिटी) गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
दिनेश भगवानदास छाबरीया (रा. सावेडी, नगर), सरला छाबरीया (रा. सावेडी, नगर), शिवाजी आनंदराव फाळके (रा. देना बॅंक शेजारी, कारेगाव), आशिष रमेश पोखरणा (रा. सर्जेपुरा, नगर), जयवंत शिवाजी फाळके (रा. कर्जत गावठाण, ता. कर्जत), आकाश राजकुमार गुरनानी (रा. हरदेवनगर, संतनिरकांरी भवन, नगर), माणिक आनंदराव पलांडे (रा. पिंपळे रोड, मुखाई, पुणे), अजय रमेश पोखरणा (रा. सर्जेपुरा, नगर), गौतम विजय बोरा (रा. एमजी रोड, कापडबाजार, नगर), नरेंद्र शांतिकुमार फिरोदिया (रा. बंगला नंबर पाच, शोभासदन, नगर), कामगार तलाठी हरिश्चंद्र विजय देशपांडे (रा. निंबळक, ता. नगर), मंडल अधिकारी दिलीप श्रीधर जायभाय (रा. नागापूर, नगर) आणि सहायक दुय्यम निबंधक कार्यालयातील तत्कालीन संबंधित अधिकारी या 13 जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
यातील नरेंद्र शांतीकुमार फिरोदिया, गौतम विजय बोरा, अजय रमेश पोखरणा, आकाश राजकुमार गुरूनानी, आशिष रमेश पोखरणा यांनी वकील सतीश गुगळे यांच्यामार्फत अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केले आहेत. आदिवासींच्या जमीन हस्तांतरास बंदी असताना देखील उताऱ्यावरील शेरा असताना, इनाम वर्ग सहाच्या जमिनीची खरेदी-विक्री झाली. या गुन्ह्याचा तपास नगर ग्रामीणचे पोलीस उपअधीक्षक संपत भोसले करत आहेत. गुन्ह्यात अद्याप एकालाही अटक झालेली नाही. आरोपींनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात अर्ज केले आहेत. तर दुसरीकडे गुन्ह्याचे तपासी अधिकारी रजेवर गेले आहेत. त्यामुळे या गुन्ह्याचा तपास नगर शहर पोलीस उपअधीक्षक अमोल भारती यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.