Ahmednagar Teacher Punished : राहुरी तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुलींची छेडछाड करून त्यांना लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य करणाऱ्या शिक्षक आरोपीला अहमदनगर येथील न्यायालयाने तीन वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. या निकालामुळे जिल्ह्यातील शिक्षक वर्गात प्रचंड खळबळ उडाली.
पीडित मुलगी राहुरी तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षण घेत होत्या. आरोपी मदन दिवे हा त्यांना शिक्षक म्हणून शिकविण्यास होता. आरोपी शिक्षक मदन दिवे याने पीडित मुलींची शाळेच्या वर्गामध्येच छेडछाड करून त्यांना लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले. या घटनेची माहिती पीडित मुलींनी त्यावेळी मुख्याध्यापकांना लेखी स्वरुपात दिली होती. त्यानंतर राहुरी पोलीस ठाण्यात आरोपी शिक्षका विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला.
नगर येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. व्ही. सहारे यांच्यासमोर हा खटला चालला. या खटल्यात नऊ साक्षीदार तपासण्यात आले. शिक्षक मदन रंगनाथ दिवे (रा. दाढ बुद्रुक, ता. राहाता) याला नगर येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. व्ही. सहारे यांनी यात दोषी धरले. बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम २०१२ च्या कलमातील तरतुदींनुसार तीन वर्षे सश्रम कारावास आणि १० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. दंड न भरल्यास सहा महिने साधी कैद आणि बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम २०१२ चे कलमातील तरतुदींनुसार एक वर्षाची सश्रम कारावासाची शिक्षा आणि पाठ हजार रुपये दंड ठोठावण्यात आला. दंड न भरल्यास दोन महिने साध्या कैदेची शिक्षा ठोठावली.
फिर्यादी, पीडित दोन मुली, मुख्याध्याप, शिक्षक व तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक निरंज जयंत बोकिल यांच्या साक्षी महत्त्वपूर्ण ठरल्या. सरकार पक्षातर्फे अतिरीक्त सरकारी अभियोक्ता ॲड. मंगेश दिवाणे यांनी काम पाहिले. पोलीस हवालदार अविनाश दुधाडे, योगेश वाघ, सहाय्यक फौजदार विलास साठे, महिला पोलीस राणी बोर्डे यांनी सहकार्य केले.