Ahmednagar News ः राहुरीतील चांदेगाव येथे १५ एप्रिलला यात्रा उत्सवात रथाची मिरवणूक झाली. यानंतर धनेश वायदंडे यांच्या घरात घुसून जातीवाचक शिवीगाळ करीत घरातील लोकांना लाथा बुक्क्यांनी मारहाण झाली. हल्लेखोरांनी घरातील सामानाची तोडफोड देखील केली. धनेश वायदंडे यांच्या फिर्यादीवरून श्रीनिवास मारुती शिंदे ऊर्फ पप्पू, बंडू शिंदे, पोपट घाडगे, रोहन गोपाल शिंदे (सर्व रा. चांदेगाव, ता. राहुरी) या चौघाविरोधात अनुसूचीत जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंदवण्यात आला.
धनेश वायदंडे चांदेगाव येथे त्यांच्या कुटुंबासह राहतात. चांदेगाव येथील ग्रामदैवत चंद्रेश्वर महाराज यांचा सालाबाद प्रमाणे यात्रा उत्सव झाला. ग्रामदैवत चंद्रेश्वर महाराज यांचे रथाची मिरवणूक संपल्यानंतर धनेश वायदंडे यांचा चुलत भाऊ दीपक अशोक वायदंडे याचे आणि श्रीनिवास मारुती शिंदे यांच्यात वाद झाले. भांडणे झाली. दीपक अशोक वायदंडे हा तेथुन पळुन धनेश वायदंडे यांच्या घराच्या शेजारून पाठीमागे पळत गेला. त्यानंतर पुन्हा मागे येऊन धनेश वायदंडे यांच्या घरावर हल्ला केला. धनेश वायदंडे यांना म्हणाले की, तुम्ही दीपक अशोक वायदंडे यास तुमच्या घरात लपून ठेवले आहे. असे म्हणत या चौघांनी धनेश वायदंडे यांच्या घरात घुसून जातीवाचक शिवीगाळ करत घरातील लोकांना लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. तसेच घरातील सामानाची तोडफोड करुन नुकसान केले.
धनेश वायदंडे यांनी राहुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. राहुरी पोलिसांनी तिघांना तत्काळ ताब्यात घेऊन गजाआड केले. एकजण पसार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. श्रीरामपूर येथील उपविभागीय अधिकारी बसवराज शिवपूजे तपास करीत आहेत.