Dr. Ambedkar Jayanti ः “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजातील जातींचे उच्चाटन करण्यासाठी खुप प्रयत्न केले. त्यासाठी जातीयंतांचा लढा देखील उभारला. आज भारतात सात हजारांपेक्षा जास्त जातींची नोंद आहे, अनेक धर्म आहेत तरीही आपला भारत देश एकसंघ आहे याचे सर्व श्रेय आपल्या राज्यघटनेला जाते. सर्व समावेशक आणि सर्व वैविध्यांचा सन्मान करणारी राज्यघटना ही जगातील अद्वितीय राज्यघटना आहे”, असे प्रतिपादन नाशिक येथील निवृत्त पोलीस अधिक्षक डॉ. संजय अपरांती यांनी केले.
राहुरी इथल्या महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 133 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी झालेल्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. संजय अपरांती बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संशोधन संचालक डॉ. सुनील गोरंटीवार होते. कुलसचिव अरुण आनंदकर, विद्यार्थी परिषदेचे उपाध्यक्ष डॉ. अतुल अत्रे, वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. विजू अमोलिक, वनस्पती रोगशास्त्र विभाग प्रमुख डॉ. अण्णासाहेब नवले, कृषि अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. विश्वनाथ शिंदे, राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक तथा विद्यार्थी कल्याण अधिकारी व कार्यक्रमाचे आयोजक डॉ. महावीरसिंग चौहान व अभियंता अभिजीत पाटील उपस्थित होते.
डॉ. संजय अपरांती म्हणाले, “प्रशासनात जाणाऱ्यांनी मी जे काही करेल ते समाजातील शेवटच्या माणसापर्यंत कसे पोहचेल याचा विचार केला पाहिजे. मी आजपर्यंत जे काही शिकलो त्याची अंमलबजावणी कृतीत कशी करता येईल हे ठरवले पाहिजे”.
डॉ. सुनील गोरंटीवार म्हणाले, “राज्यघटना लिहिण्याचे फार मोठे काम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केले. याचबरोबर त्यांनी भुमीहिन मजूर व सघन शेती या शेतीविषयक धोरणात बदल सुचविले”. जास्त पूर येणाऱ्या प्रदेशातील शेती वाचविण्यासाठी धरणे बांधली पाहिजेत, असा दृष्टीकोन ठेवून दामोधरसारखे प्रकल्प बांधल्यामुळे उत्तर प्रदेश तसेच बिहार या राज्यांमधील पूर परिस्थिती आटोक्यात आली. डॉ. आंबेडकरांनी लिहिलेल्या राज्यघटनेमुळे भारतातील समाज एकसंघ राहण्यात मोठी मदत झाल्याचे डाॅ. गोरंटीवार यांनी सांगितले.
कुलसचिव अरुण आनंदकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे जगाला पडलेले एक सुंदर स्वप्न होय. आपल्याकडे जे काही आहे ते लोकशाहीमुळे आहे. आपल्याला जर सन्मानीय नागरीक म्हणून जगायचे असेल तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारानेच आपल्याला पुढे जावे लागेल, असे सांगितले.
डॉ. महावीरसिंग चौहान यांनी प्रास्ताविक केले. दिव्या साठे हिने सूत्रसंचालन केले. डॉ. विजू अमोलिक यांनी आभार मानले.