Ahmednagar News ः अहमदनगर शहरातील सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक नरेंद्र शांतिकुमार फिरोदियासह 13 जणांविरोधात अनुसूचित प्रतिबंध कायदा (अॅट्रोसिटी) आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला. जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. एस. लोणे यांनी केलेल्या आदेशानुसार एमआयडीसी पोलिसांनी गुन्ह्याची नोंद घेतली आहे.
दिनेश भगवानदास छाबरीया (रा. सावेडी, नगर), सरला छाबरीया (रा. सावेडी, नगर), शिवाजी आनंदराव फाळके (रा. देना बॅंक शेजारी, कारेगाव), आशिष रमेश पोखरणा (रा. सर्जेपुरा, नगर), जयवंत शिवाजी फाळके (रा. कर्जत गावठाण, ता. कर्जत), आकाश राजकुमार गुरनानी (रा. हरदेवनगर, संतनिरकांरी भवन, नगर), माणिक आनंदराव पलांडे (रा. पिंपळे रोड, मुखाई, पुणे), अजय रमेश पोखरणा (रा. सर्जेपुरा, नगर), गौतम विजय बोरा (रा. एमजी रोड, कापडबाजार, नगर), नरेंद्र शांतिकुमार फिरोदिया (रा. बंगला नंबर पाच, शोभासदन, नगर), कामगार तलाठी हरिश्चंद्र विजय देशपांडे (रा. निंबळक, ता. नगर), मंडल अधिकारी दिलीप श्रीधर जायभाय (रा. नागापूर, नगर) आणि सहायक दुय्यम निबंधक कार्यालयातील तत्कालीन संबंधित अधिकारी या 13 जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
आदिवासी महिलेची संगमताने फसवणूक केली आहे. तक्रारदार महिलेने पोलीस, महसूल यंत्रणेकडे याबाबत तक्रार केली होती. तिथे दखल न घेतल्याने न्यायालयात धाव घेतली. महिला आणि तिचे कुटुंब इनाम वर्ग जमिनीवर राहते. तिथे त्यांची झोपडे आहेत. ते हटविण्यासाठी आरोपींनी गुंडांकडून देखील धमकावले आहे. या सर्व प्रकाराची गंभीर दखल जिल्हा न्यायालयाने घेतली आणि पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला.
वकील सागर पादिर,
अहमदनगर
सिंधुबाई मुरलीधर निकम (रा. निंबळक, ता. नगर) यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल झाला आहे. वकील सागर पादिर यांच्यामार्फत सिंधुबाई निकम यांनी न्यायालयात खासगी तक्रार दाखल केली होती. जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. एस लोणे यांनी या तक्रारीची गंभीर दखल घेत पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचा आदेश केला. एमआयडीसी पोलिसांनी न्यायालयाच्या आदेशानुसार गु्न्ह्याची नोंद घेतली आहे. या १३ जणांविरोधात कट करणे, फसवणूक करणे, कागदपत्रांमध्ये चालबाजी करणे, बनावट दस्ताएवेज तयार करून ते खरे असल्याचा वापर करणे, बनावट दस्ताएवेज संभाळून ठेवत ते खरे असल्याचा वापर करणे, संगनमताने गुन्हा करणे आणि अनुसूचित जाती आणि जमाती प्रतिबंध अधिनियमातील तरतुदींनुसार हा गुन्हा दाखल झाला आहे.
निंबळक (ता. नगर) येथील खरेदीस प्रतिबंध असलेल्या इनाम वर्ग जमिनीची खेरदी करून आदिवासी महिलेला भूमिहीन केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल झाला आहे. ऑक्टोबर २०१० ते एप्रिल २०२४ या काळात विविध खरेदी खतांद्वारे या जमिनीची परस्पर खरेदी, विक्री, फेरखरेदी करण्यात आली आहे. यामध्ये आपली फसवणूक झाल्याची तक्रार सिंधुबाई निकम यांनी केली. पोलिसांनी दखल न घेतल्या त्यांनी वकील सागर पादिर यांच्यामार्फत न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने गुन्हा दाखल करून तपास करण्याचा आदेश दिला. त्यानुसार एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.