Ahmednagar News ः “तुमच्या शिक्षणाचा उपयोग शेतकऱ्यांना शेतमाल विक्रीचे कौशल्य शिकविण्यासाठी करा. महात्मा फुलेंनी ब्रिटीश सरकारने केलेल्या शेतकरी विरोधी कायद्यांना प्रखरपणे विरोध केला. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर वेळोवेळी आवाज उठविला व त्यावेळच्या सरकारला शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी भाग पाडले. आजही शेतकऱ्यांच्या अडचणी संपलेल्या नाहीत. दिवसेंदिवस शेती करणे अडचणीचे ठरत असून यासाठी विद्यापीठातील तरुणांनी तसेच शास्त्रज्ञ, प्राध्यापक यांनी महात्मा जोतिबा फुले यांनी शेतकऱ्यांसाठी केलेल्या कार्याची दखल घेवून शेतकऱ्यांचे जीवन सुसह्य होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत,” असे प्रतिपादन सुप्रसिध्द व्याख्याते तथा महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कार्यकारी परिषद सदस्य गणेश शिंदे यांनी केले.
राहुरी महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे कुलगुरु डॉ. पी. जी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. नानासाहेब पवार सभागृहात महात्मा जोतिबा फुले यांची 197 वी जयंती साजरी करण्यात आली. प्रमुख पाहुणे म्हणुन गणेश शिंदे बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. सुनील गोरंटीवार होते. यावेळी अधिष्ठाता डॉ. श्रीमंत रणपिसे, कुलसचिव अरुण आनंदकर, नियंत्रक सदाशिव पाटील, पदव्युत्तर महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. विठ्ठल शिर्के, कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. दिलीप पवार, सहयोगी अधिष्ठाता (निकृशि) डॉ. साताप्पा खरबडे, कार्यक्रमाचे आयोजक राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. महावीर सिंग चौहान, क्रीडा अधिकारी डॉ. विलास आवारी व कवयित्री मंगला रोकडे उपस्थित होते.
गणेश शिंदे म्हणाले, “निसर्गासोबत नाळ जोडा. जात धर्माच्या पलिकडे जावून माणुस म्हणुन जगा व दुसऱ्यांबरोबर संवेदनशील राहा. स्वतःच्या पायावर भक्कमपणे उभे राहता येईल असे शिक्षण घ्या. मी घेत असलेले शिक्षण समाजाभिमुख कसे होईल ते पहा. आजचे जग अस्वस्थ करणारे असून या जगात तुम्ही अस्वस्थ न राहता येणाऱ्या संकटांना आत्मविश्वासाने सामोरे जा”. दोन पावले माघार घ्या. परंतु पुन्हा नव्या जोमाने आलेल्या संकटांना न घाबरता तोंड द्या. मोठी स्वप्ने पहा व ती पूर्ण करण्यासाठी खुप मेहनत घ्या, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
डॉ. सुनील गोरंटीवार यांनी विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षणाचा उपयोग देशाच्या तसेच शेतकर्यांच्या उन्नतीसाठी केला पाहिजे. विद्यापीठामध्ये भविष्यातील संशोधन असे राहिल की शेतकरी एके ठिकाणी बसून शेतीमधील सर्व कामे स्वयंचलीत पध्दतीने करु शकेल अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
प्रास्ताविक व पाहुण्यांची ओळख डॉ. महावीर सिंग चौहान यांनी करुन दिली. यावेळी एरंडोल (जि. जळगांव) येथील कवयित्री मंगला रोकडे यांच्या सत्यार्थ दिपिका या महात्मा जोतिबा फुले यांच्यावरील काव्यसंग्रहाचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमासाठी विद्यापीठातील माजी विस्तार शिक्षण संचालक डॉ. सी.एस. पाटील, विभाग प्रमुख डॉ. महानंद माने, डॉ. विश्वनाथ शिंदे, प्रसारण केंद्र प्रमुख डॉ. पंडित खर्डे, प्राध्यापक व पदव्युत्तर महाविद्यालय तसेच कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयाचे विद्यार्थी, विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. गणेश माळी यांनी सूत्रसंचालन तर डॉ. विलास आवारी यांनी आभार मानले.