Ahmednagar News ः बेघर, निराधार, पिडीत मनोरुग्ण महिला व बंधूंच्या उपचार आणि पुनर्वसनासाठी कार्य करणाऱ्या श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळाच्या मानवसेवा प्रकल्पाच्या इमारतीच्या कामाचे भूमिपूजन उद्योजक रमनलालजी लुंकड व समाजसेवक सुवालाल शिंगवी यांच्या हस्ते झाले. मानवसेवा प्रकल्पाच्या कार्याला हातभार लावण्यासाठी पुणे येथील उद्योजक रमनलालजी लुंकड यांच्या आर्थिक योगदानाने मानवसेवा प्रकल्पाची सुसज्ज इमारत उभी राहत आहे.
या कार्यक्रमासाठी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी समर्थ शेवाळे, सुनिता गरड, आकाश लुंकड, संजय शिंगवी, नाना भोरे, विकास सांगळे, चंद्रकांत तागड, संस्थेचे संस्थापक दिलीप गुंजाळ, राजेंद्र छल्लाणी, गटागट, लौकिक शिंगवी, भरत बागरेचा, अमर अग्रवाल, सुरेश मैड आदी उपस्थित होते.
रमनलालजी लुंकड म्हणाले, “ज्यांना समाजाने नाकारलं, हेटाळलं त्या निराधार पिडीत मानसिक विकलांगांच्या उसवलेल्या आयुष्यात मायेचा टाका घालायचे काम मानवसेवा प्रकल्प करत आहे. त्यांचे आयुष्य बदलून पून्हा माणुस म्हणून समाजात उभं करण्याचे काम केले जात आहे”. दिलीप गुंजाळ यांनी उभे केलेले मानवतेचे कार्य मानसिक विकलांगांना नवजीवन देत असून, या कार्यात लुंकड परिवाराने हातभार लावण्याचा आनंद होत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
प्रास्ताविकात दिलीप गुंजाळ यांनी रस्त्यावर फिरणाऱ्या निराधार पीडित मनोरुग्ण महिला व पुरुषांना पोलीसांच्या मदतीने मायेने आणायचे आणि त्यांना चांगल्या स्थितीत ठेवून मुलभूत सुविधा पुरवायच्या आणि समुपदेशन, उपचार करुन पुन्हा त्यांच्या आयुष्यात नवी दिशा देण्याचा प्रयत्न संस्थेच्या माध्यमातून केला जात आहे. अशा व्यक्तींना पुन्हा माणुस म्हणून समाजात आणि त्यांच्या हक्काच्या कुटुंबात पोहचवून पुनर्वसन करायचे कार्य श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळाचे मानवसेवा प्रकल्प करीत आहे. अडीच हजार निराधार पिडीत मनोरुग्ण महिला व पुरुषाचे पुनर्वसन करण्यात आले आहे आणि सध्या मानवसेवा प्रकल्पात 93 लाभार्थी उपचार घेत असल्याची माहिती त्यांनी दिली.
रमनलाल लुंकड यांचे नातू आकाश लुंकड यांनी काही महिन्यांपूर्वी श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळाच्या मानवसेवा प्रकल्पाला भेट दिली होती. लुंकड यांना मानवसेवा प्रकल्पाचे कार्य भावले आणि कुटुंबीयांशी या कार्याबद्दल चर्चा केली. आजोबा रमनलालजी लुंकड यांनी श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळाच्या मानवसेवा प्रकल्पाला सुसज्ज इमारतीचे बांधकाम करुन देण्याचे ठरवले होते. लुंकड यांनी दातृत्वासाठी पुढाकार घेवून सदर कामाला प्रारंभ केले आहे. कार्यक्रम यशस्वीतेसाठी संस्थेचे स्वयंसेवक अंबादास गुंजाळ, सिराज शेख, ऋतिक बर्डे, मथुरा जाधव, प्रशांत जाधव, पुजा मुठे, विकास बर्डे, प्रसाद माळी, सागर विटकर, राहुल साबळे, अजय दळवी, मच्छिंद्र दुधवडे, श्रीकांत शिरसाठ यांनी परिश्रम घेतले.