Ahmednagar Newsः अहमदनगर साईबन व मंगळागौर महिला उत्सव समूहाच्यावतीने नृत्यांगणा मानसी देठे यांना नुकतेच ‘उत्कृष्ट संघटक व उत्कृष्ट नृत्य दिग्दर्शक’ मानपत्र देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी नोबेल पिस अॅवॉर्ड नामांकित डॉ.सौ.सुधा कांकरिया, मनपा आयुक्त डॉ.पंकज जावळे, डॉ.धनश्री खरवंडीकर, अभिनेते मोहिनीराज गटणे, रसिक ग्रुपचे जयंत येलुलकर, डॉ.प्रकाश कांकरिया आदि उपस्थित होते.
मानसी देठे या भरतनाट्यम विशारद आहेत. त्याचबरोबर अनेक मुलींना त्या भरतनाट्यम सह विविध नृत्य कला शिकवत आहेत. तसेच विविध सण-उत्सवातील पारंपारिक नृत्य प्रकार शिकविण्याबरोबरच त्यांचा कलाविष्कार सादर करत असतात. मंगळगौर महिला उत्सव टिमच्या माध्यमातून पारंपारिक नृत्यांना प्रोत्साहन देण्याचा त्याचा प्रयत्न आहे. विविध कार्यक्रमातून कलकारांना व्यासपीठ उपलब्ध करुन देत कलेला प्रोत्साहन देत आहेत. त्यांच्या सांस्कृतिक क्षेत्रात अविरतपणे सुरु असलेल्या कार्याची दखल घेत त्यांना साईबन येथे झालेल्या ‘भावकलांची रंगपंचमी’ कार्यक्रमात भारतनाट्यम् नृत्यतिलका डॉ.सुधा कांकरिया यांच्या हस्ते मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
आयुक्त डॉ.पंकज जावळे म्हणाले, “प्रत्येकांच्या अंगी कला असते, त्या कलेला तंत्रशुद्ध मार्गदर्शनाची जोड मिळाल्यास ती अधिक बहरत असते. मानसी देठे यांनी नवनवीन कलाकारांना नृत्यांचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देऊन त्यांचातील कलाकाराला सर्वांसमोर आणत आहेत”. पारंपारिक नृत्य कला नवीन पिढीपर्यंत पोहचविण्याचा उपक्रम कौतुकास्पद असाच असल्याने मानपत्राने गौरव केल्याने त्यांना प्रोत्साहन मिळेल असे सांगितले.
डॉ.सुधा कांकरिया यांनी मानसी देठे यांचा प्रशिक्षणा देण्याबरोबरच नृत्य कलाकारांचा कलाविष्कार सर्वांसमोर सादर करुन त्यांच्या कलेला प्रोत्साहन देत आहेत. सण-उत्सवानिमित्त महिला-युवतींना पारंपारिक नृत्यांची गोडी लावत भारतीय संस्कृती जपण्याचे काम करत आहेत. मानपत्र रुपी गौरव त्यांच्या कार्याची पावतीच आहे. जयंत येलूलकर, डॉ.धनश्री खरवंडीकर, मोहिनीराज गटणे आदिंनीही मानसी देठे यांच्या कार्याचा गौरव करुन अभिनंदन केले.