Ahmednagar News : अहमदनगरमध्ये गाजलेल्या संपदा नागरी सहकारी पतसंस्थेच्या गैरव्यवहारप्रकरणी दाखल गुन्ह्यात नगर न्यायालयाने सर्व संचालक मंडळांना दोषी धरले आहे. तत्कालीन संस्थापक अध्यक्ष ज्ञानदेव वाफारे याच्यासह 17 संचालक मंडळाला न्यायालय आठ एप्रिलला शिक्षेची सुनावणी करणार आहे. यानंतर नगर पोलिसांनी ज्ञानदेव वाफारे याच्यासह सह संचालक मंडळाला ताब्यात घेतले आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश एन. आर. नाईकवाडे आठ एप्रिलला संपदा गैरव्यवहारप्रकरणी दाखल गुन्ह्यात शिक्षा सुनावणार आहेत.
ज्ञानदेव सबाजी वाफारे, सुजाता ज्ञानदेव वाफारे, सुधाकर परशुराम थोरात, भाऊसाहेब कुशाबा झावरे, उत्तमराव दगडू चेमटे, दिनकर बाबाजी ठुबे, विष्णुपंत गणपत व्यवहारे, राजे हसन अमीर, बबन देवराम झावरे, लहू सयाजी घंगाळे, हरिश्चंद्र सावळेराम लोंढे, रवींद्र विठ्ठलराव शिंदे, साहेबराव रामचंद्र ऊर्फ बाळासाहेब भालेकर, संजय चंपालाल बोरा, अनुष प्रवीण पारेख, मारूती खंडू रोहोकले, निमाजी खंडू रोहोकले, सुधाकर गोपीनाथ सुंबे, गोपीनाथ शंकर सुंबे, महेश बबन झावरे आणि संगीत हरिश्चंद्र लोंढे या संचालकांना दोषी धरले आहे.
संपदा नागरी पतसंस्थेत सुमारे 13 कोटी 38 लाख 55 हजार 667 रुपयांचा अपहार झाला होता. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. लेखापरीक्षक देवराम मारूतराव बारसकर यांनी फिर्याद दिली होती. विनातारण आणि नियमबाह्य कर्ज कर्जदारांना वाटप करण्यात आले. तत्कालीन संचालक मंडळातील सदस्य, त्यांच्या नातेवाईकांना आणि कर्मचारी यांना बेकायदेशीररित्या कर्ज वाटप झाले होते. बॅंकेत सभासदांच्या रकमेचा अपहार झाल्याचे फिर्यादीत म्हटले होते. यामुळे बॅंकेने सभासदांना ठेवी परत करण्यास असमर्थता दर्शवली. बॅंकेतील ठेवीमध्ये रकमेत अफरातफर झाली.
दाखल गुन्ह्यात दोषारोपपत्र दाखल झाले. न्यायालयात हा खटला सुरू होता. दोन्ही बाजूने युक्तिवाद झाला. सरकार पक्षातर्फे सरकारी वकील अनिल ढगे यांनी बाजू मांडली. जिल्हा व सत्र न्यायाधीश एन. आर. नाईकवाडे यांनी याप्रकरणात बॅंकेचे तत्कालीन संचालकांना दोषी धरले आहे. निकाल आठ एप्रिलला देणार आहे.