Ahmednagar Political ः लोकसभा निवडणुकीमुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघू लागले आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीत घमासान सुरू आहे. यामुळे राज्यात कोण कोणाच्या आघाडीत आणि युतीत हेच कळायला मार्ग नाही. सोयीचे राजकारण हाच अजेंडा दिसतो आहे. यातून राज्यात विकासाचा मुद्दा हा बाजुला राहिलेला दिसतो. आघाडी आणि युतीच्या खेळात पदाधिकारी आणि कार्यकर्ते देखील सैरभैर झाले आहे. आश्वासक चेहरा दिसत नाही. जनतेला पर्याय हवा आहे. यातून ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादूल मुस्लिमीन पक्षाने अहमदनगरसह राज्यातील काही लोकसभा लढवण्याचा निर्णय घेतल्याची घोषणा प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांनी दिली.
एमआयएम पक्षाचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष डॉ. परवेज अशरफी आणि पदाधिकारी यांनी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील आणि प्रदेश कार्याध्यक्ष डॉ. गफ्फार कादरी यांची भेट घेतली. या भेटीत नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाबाबत चर्चा झाली. नगर दक्षिण लोकसभा मतदार संघाची सविस्तर माहिती देऊन पक्ष कसे निवडणूक रिंगणात आपले उमेदवार देऊ शकतो, यावर सविस्तर चर्चा झाली. एमआयएमच्या माध्यामातून औरंगाबादामध्ये खासदार इम्तियाज जलील यांनी जनतेचे कामे केलीत. नागरिकांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरले. अनेक प्रश्न मार्गी लावले, त्याच प्रकारे अहमदनगरमध्ये औरंगाबाद पॅटर्न राबवण्याची गरज जिल्हाध्यक्ष डॉ. परवेज अशरफी यांनी यावेळी व्यक्त केली.
खासदार इम्तियाज जलील व डॉ. गफ्फार कादरी नगर दक्षिण लोकसभाबाबत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असदउद्दीन ओवेसी यांच्याबरोबर चर्चा करून निर्णय घेणार आहे. अहमदनगरच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश खासदार इम्तियाज जलील यांनी दिले आहेत. महाराष्ट्रात गढूळ राजकारणाला नागरिक वैतागले असून अहमदनगरसह पूर्ण देशात एमआयएम पक्ष हा पर्याय ठरू शकतो. लवकरच खासदार इम्तियाज जलील महाराष्ट्रातील एमआयएम पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना निवडणुकीत कुठे कोणती भूमिका घ्यायची याची माहिती देणार असल्याचे डॉ. परवेज अशरफी यांनी सांगितले.