Book Publishing ः ‘आम्हा घरी धन.. शब्द हीच रत्ने’ असे जगतगुरु तुकाराम महाराजांनी म्हटले आहे. प्रचंड वाचन केल्याशिवाय तो लेखक होऊ शकणार नाही. ‘दिसामाजी काही तरी लिहावे। प्रसंगी अखंडीत वाचित जावे’ असे समर्थ रामदास स्वामींनी म्हटले आहे. वाचनाने शब्द संग्रह वाढतो. ज्येष्ठराज या अंकात तुम्ही जे-जे साहित्य दिले ते अतिशय सुरेख आहे. प्रत्येक लेखातून बोध होतो. कविताही मनाचा ठाव घेतात. संतांची ग्रंथ संपदा अफाट आहे ते वाचल्यावर अध्यात्मिक व पारमार्थिक अशी विचारांची चिंतनाची सवय ज्येष्ठांना लागते. प्रचंड वाचन हे लेखकाचे मूळ भांडवल असते. ‘दुरावा’ ही कथा कारसेवेतील अनुभव ‘वाटसरु’ ही कविता तसेच ‘हट्टी पाऊस’ लेखन उत्कृष्ट आहे, असे विचार शुभदा कुलकर्णी यांनी मांडले.
नंदकुमार ब्रह्मे लिखित ‘किनारा’ या कथा संग्रहाचे उद्घाटन हेमंत लोहगावकर यांनी केले. ते म्हणाले, प्रत्येक कथा वाचनिय आहे. रक्ताची नाती टिकविली तरच कुटूंब व्यवस्था पुर्णत्वास येते. या वयात श्रीयुत ब्रह्मे यांनी आपला छंद जोपासला आहे, याचे कौतुक वाटते, त्यांच्यापासून प्रत्येकाने प्रेरणा घेऊन आपल्या आवडीचा छंद जोपासावा.
मंचाचे अध्यक्ष आदिनाथ जोशी म्हणाले, “सभासदांनी केलेल्या कामाचे, केलेल्या साहित्य लेखनाचे, त्यांनी मिळविलेल्या पुरस्कार, सन्मानाचे आम्ही नेहमीच कौतुक करत असतो”. ‘ज्येष्ठराज’ अंकाच्या संपादिका पुष्पा चिंताबर यांनी चांगले साहित्य वाचकाला अंतर्मुख करणारे जिज्ञासा वाढविणारे आहे. त्यामुळे आपल्या जाणिवांच्या कक्षा रुंदावते, वैचारिक व सांस्कृतिक समृद्धी साधली जाते याचा मला विश्वास आहे, असे सांगितले.
अंकासाठी कार्यवाह शरदराव कुलकर्णी यांनी मोलाचे सहकार्य केले. सभासदांनी वेळेच्या आत आपले साहित्य आणून दिले, त्यामुळे हा अंक दर्जेदार झाला. ‘क्रिएटीव्ह कम्युनिकेशन’चे जयंत देशपांडे व रुपेश हिवाळे यांनी अंक सुशोभित केला. मंचला विनायक ढाकेफळकर यांनी पंचवीस हजार रुपयांची देणगी दिली.
कार्यक्रमास मंचचे अध्यक्ष आदिनाथ जोशी, शरदराव कुलकर्णी, बाजीराव जाधव, सुरेश कुलकर्णी, पुष्पा चिंताबर, ज्योती केसकर, स्नेहल वेलणकर, बलभिम पांडव, मोरेश्वर मुळे, माधवी कुलकर्णी, शोभा ढेपे, कुमुदिनी बोपर्डीकर, रत्नाकर कुलकर्णी, मोहन नातू, शिला हळकुंडे, मनोहर केसकर उपस्थित होते.