Shirdi Lok Sabha Election ः राज्यात महायुतीकडून दोन तरी जागा मिळाल्या पाहिजे होत्या. शिर्डीची जागा आम्हाला महत्त्वाची होती. ती रिपाईला पाहिजेच होती. परंतु महायुतीत रिपाईला निवडणुकीत काही मिळाले नाही. तरी भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाली आहे. यानंतर रिपाईचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी महायुतीत राहणार असल्याचे जाहीर केले.
मंत्री रामदास आठवले म्हणाले, “महायुतीत आम्ही दहा वर्षांपासून आहोत. भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकांची कामे पूर्ण झाली आहे. संविधानाला मजबूत करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे आम्ही महायुतीसोबत राहणार आहोत. राज्यात महायुतीसोबत आहोत. या निवडणुकीत एखादी जागा मिळाली असती, तर बरे झाले असते. ईशान्य मुंबई मिळाली असती, तर लढू शकलो असतो. परंतु महायुतीतील त्यांचे सर्व निर्णय झाले आहेत”. जागा मिळत नसतील, तर केंद्रात कॅबिनेट मंत्रीपद मिळाले पाहिजे. राज्यात मंत्रिपद मिळाले पाहिजे. एक विधानपरिषद मिळाली पाहिजे, असेही मंत्री रामदास आठवले यांनी सांगितले.
तसेच विधानसभेच्या निवडणुकीत आठ ते दहा जागा मिळाल्या पाहिजेत. राज्यात असलेल्या महामंडळामध्ये दोन अध्यक्ष, काही उपाध्यक्ष किंवा सदस्यपद मिळाले पाहिजेत. तसेच जिल्हा नियोजन मंडळावर देखील सदस्यपद मिळाले पाहिजेत. अशा सर्व गोष्टींवर भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाली आहे. या सर्व मागण्या मान्य केल्याची माहिती, मंत्री रामदास आठवले यांनी दिली.
मंत्री रामदास आठवले शिर्डी लोकसभा मतदारसंघावर दावा केला होता. महायुतीकडे तसा प्रस्ताव ठेवला होता. परंतु महायुतीत असलेल्या शिवसेना एकनाथ शिंदे गटाने या जागेवर दावा कायम ठेवत विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांना उमेदवारी जाहीर केली. शिर्डीची जागा आमच्यासाठी महत्त्वाची होती. तशी ती आम्हाला लढवायची होती. परंतु महायुतीत सर्व निर्णय झाल्याचे सांगून मंत्री रामदास आठवले यांनी शिर्डी लोकसभा मतदारसंघावर केलेला दावा सोडून दिला आहे.
शिर्डी मतदारसंघ मिळाला नसल्याने रिपाई आठवले गट चांगलाच नाराज झाला आहे. या मतदारसंघात रिपाई आठवले गट कोणती भूमिका घेणार पुढे स्पष्ट होईल. दावा करतावेळी पदाधिकारी आणि कार्यकर्ते सुरूवातीला आक्रमक होते. परंतु महायुतीतून शिवसेना शिंदे गटाने विद्यमान खासदारांना उमेदवारी जाहीर केल्याने रिपाई आठवले गटाचे कार्यकर्ते एकदम शांत झाले आहे. पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची ही शांतता वादळापूर्वीची तर नाही ना, अशी चर्चा आता रंगली आहे. त्यामुळे निवडणुकीत रिपाई आठवले गट काय भूमिका घेतो, याकडे आता लक्ष लागले आहे.