Rahuri Agricultural University Staff Coordinating Association ः राहुरीतील महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथील कर्मचारी समन्वय संघटनेच्या अध्यक्षपदी वनस्पती रोग शास्त्र विभागातील प्रा. डॉ. संजय कोळसे यांची समन्वय संघाच्या बैठकीत सर्वानुमते निवड करण्यात आली. यावेळी मावळते अध्यक्ष डॉ. चिंतामणी देवकर विद्यापीठ सेवेमधून निवृत्ती झाल्यामुळे त्यांना सन्मानपूर्वक निरोप देण्यात आला.
या बैठकीमध्ये डॉ. संजय कोळसे यांची अध्यक्षपदी तर संदीप लवांदे यांची उपाध्यक्षपदी, मोहन काळे यांची संघटकपदी व दीपक आवटी यांची सहखजिनदारपदी निवड करण्यात आली. डॉ. संजय कोळसे यांनी समन्वय संघटनेच्या स्थापनेपासून संघटनेत विविध पदांवर काम केले असून यापूर्वी त्यांनी कृषि विज्ञान प्राध्यापक सहकारी पतसंस्थेमध्ये तसेच सावित्रीबाई शिक्षण संस्थेमध्ये संचालकपदी व उपाध्यक्षपदी काम केले आहे.
डॉ. कोळसे वनस्पती रोगशास्त्र विभागामधील शेतकर्यांच्या बांधावर जाऊन समस्या सोडविण्यास प्राधान्य देणारे शास्त्रज्ञ असून ते कृषि शिक्षणामध्ये पदव्युत्तर तसेच आचार्य पदवीच्या विद्यार्थ्यांना संशोधन मार्गदर्शक म्हणून काम करीत आहेत. डॉ. संजय कोळसे यांच्या या निवडीबद्दल विद्यापीठ परिसरातून सर्व प्राध्यापक, शास्त्रज्ञ व कर्मचारी यांनी त्यांचे कौतुक केले.