Rahuri Shrine Dispute : राहुरीतील गुहा येथील धार्मिक स्थळाचा वाद हिंदू-मुस्लिम समाजाकडून निकाली काढण्याचा प्रयत्न सुरू झाले आहे. हे धार्मिक स्थळ हिंदू-मुस्लिम, अशा दोन्ही समाजाचे श्रद्धास्थान आहे. या धार्मिक स्थळाची देखभाल करण्यासाठी ब्रिटिश काळापासून स्थानिक अल्पसंख्याक समाजाकडे आहे. तशी काही कागदपत्रे समोर येतात.
गेल्या दीड वर्षापासून या ठिकाणचे धार्मिक स्थळ हे हिंदू धर्मियांचे आहे, अशा मुद्यावरून हिंदू-मुस्लिम समाजात वाद सुरू आहे. हा वाद आता वक्फ बोर्ड, जिल्हाधिकारी प्रशासन, पोलीस यंत्रणा आणि राज्य सरकारच्या विविध प्रशासकीय अधिकार्यांसमोर आणि न्यायालयात सुरू आहेत.
गुहा येथील धार्मिक स्थळाचा वाद लवकरात लवकर न्यायपद्धतीने निकालात निघावा, यासाठी आवश्यक ते सहकार्य सलोखा संपर्क गट करण्यास तयार आहे. डॉ. संजीवनी कुलकर्णी (पुणे), डॉ. वंदना पलसाने, (पुणे), मीनाज सय्यद (सातारा), डॉ. निलिमा गावडे (पुणे), प्रमोद मुजुमदार (पुणे), झिया कुरेशी, डॉ. मंजिरी निंबकर (फलटण), निशा साळगावकर (पुणे), मुकुंद बहाळकर (पुणे), हीनकौसर खान (पुणे) आदी उपस्थित होते.
राज्यातील मुख्यतः बहुजन गोरगरीब लोकांच्या श्रद्धेची स्थाने असलेले सर्व धार्मिक स्थळे आणि स्थानिक देवस्थानांचे संरक्षण करण्यासाठी विशेष धोरण आखावे, अशी मागणी गुहा प्रकरणानिमित्ताने राज्य सरकारकडे करण्यात आली आहे. यासर्व संयुक्त श्रद्धास्थानांचे सहिष्णू स्वरूप अबाधित ठेवण्यासाठी स्थानिक लोकांच्या सहभागाच्या समित्या स्थापन करण्यात याव्यात.
गुहा येथील धार्मिक स्थळाचा वाद 28 डिसेंबर 2023 पासून तीव्र झाला आहे. गुहा येथे निर्माण झालेल्या या तणावामुळे स्थानिक अल्पसंख्याक समाजाला वाळीत टाकण्यात आल्याचे दिसते. महाराष्ट्राच्या सामाजिक आणि सांस्कृतिक सलोख्यासाठी ही अतिशय गंभीर बाब आहे. या पार्श्वभूमीवर गुहा येथील अल्पसंख्याक समाजाने आपल्या धर्माचरणाच्या संवैधानिक हक्कांसाठी तहसीलदार कचेरी, राहुरी येथे गेल्या 87 दिवस धरणे आंदोलन केले आहे. या धार्मिक स्थळाच्या संबंधित विविध सरकारी अधिकार्यांसमोर असलेले विवाद आणि न्यायालयात दाखल असलेल्या खटल्यांबाबत तातडीने निर्णय होणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे तोपर्यंत धार्मिक स्थळाशी संबंधित सर्व नागरिकांनी संयम बाळगावा. न्यायालयीन निर्णयाप्रमाणे ते यथास्थिती टिकविणे हे सर्व घटकांवर बंधनकारक आहे, असे सलोखा संपर्क गटाने म्हटले आहे.