Nagar News : नगर तालुक्यातील निमगाव वाघा येथे किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ, धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालय व नवनाथ विद्यालयाच्यावतीने स्वच्छता अभियान राबवून, आमली पदार्थाची होळी करण्यात आली. तसेच शालेय विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धन व व्यसनमुक्तीची शपथ देण्यात आली.
नवनाथ विद्यालयाच्या परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. जमा झालेल्या झाडांच्या पाला-पाचोळ्याची होळी पेटविण्यात आली. होळीत मावा, गुटखा, तंबाखू, विडी, दारुच्या बाटल्या, सिगारेट टाकून आमली पदार्थांचे दहण करण्यात आले. यावेळी डोंगरे संस्थेचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य नाना डोंगरे, मुख्याध्यापक उत्तम कांडेकर, विमल रासकर, युवा मंडळाचे अध्यक्ष संदीप डोंगरे उपस्थित होते.
नाना डोंगरे म्हणाले, “युवकांमध्ये व्यसनाचे वाढते प्रमाण चिंताजनक आहे. तंबाखू, विडी सिगारेटमुळे कॅन्सरचे प्रमाण वाढत आहे. देशात कॅन्सरचे प्रमाण छपाट्याने वाढत असून, त्याला तंबाखू, विडी सिगारेट प्रमुख कारण ठरत आहे. तर दारुने अनेकांचे संसार उद्धवस्त होत आहे”. युवकांनी व्यसनांची होळी करुन निरोगी जीवन जगावे. होळीसाठी लाकूड न जाळता वाळलेला पाला, पाचोळा जाळल्यास एक पर्यावरणपुरक होळी साजरी करता येणार असल्याचे सांगून, पर्यावरण संवर्धन व व्यसनमुक्तीचे आवाहन केले.
मुख्याध्यापक उत्तम कांडेकर यांनी गावात स्वच्छता मोहीम व्यापक प्रमाणात राबविण्यासाठी युवकांनी पुढाकार घेण्याची गरज असल्याचे सांगून, यामुळे गाव निर्मळ व निरोगी होणार असल्याची आशा व्यक्त केली. या मोहिमेत शालेय विद्यार्थी अवधूत जाधव, तन्मय वाबळे, सारंग निमसे, आर्यन ठोंबे, सार्थक पाचारणे, हर्ष गुंजाळ, साई फलके, सोहम जाधव, रहिम शेख सहभागी झाले होते. या उपक्रमास नेहरु युवा केंद्र व जिल्हा क्रीडा कार्यालयाचे मार्गदर्शन लाभले.