Aam Aadmi Party ः आम आदमी पक्षाचे नेते तथा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने केलेली अटक ही लोकशाहीवरील हल्ला आहे. हुकुमशाही सत्ताधारी यांनी राजकीय सुढाच्या भावनेतून केलेल्या कृत्याचा नगर शहरात आम आदमी पक्षाच्यावतीने निषेध व्यक्त करण्यात आला. हिटलरशाहीच्या प्रतिकात्मक पुतळ्यास जोडे मारो आंदोलन करण्यात आले. या पुतळ्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या प्रतिमा टांगून तानाशाही आणि हिटलरशाही विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. केंद्रातील भाजप सरकार तपास यंत्रणांचा वापर करुन विरोधकांना संपविण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला.
या आंदोलनात आपचे शहर जिल्हाध्यक्ष भरत खाकाळ, महिला अध्यक्ष ॲड. विद्या शिंदे, उपाध्यक्ष गणेश मारवाडे, व्यापारी आघाडीचे अध्यक्ष राजेंद्र सामल, कला-सांस्कृतिक आघाडीचे अध्यक्ष प्रकाश वडवणीकर, उपाध्यक्ष सिताराम खाकाळ सहभागी झाले होते.
भरत खाकाळ म्हणाले, “विरोधकांना मोडित काढण्यासाठी सत्ताधारी भाजप तपास यंत्रणेचा वापर करुन त्यांना जेलमध्ये टाकण्याचे काम करत आहे. भाजपला शरण या, अन्यथा जेलमध्ये जा! हा एकमेव तंत्र अवलंबले जात आहे. त्यामुळे देशाचे संविधान आणि लोकशाही धोक्यात आली आहे”. आपने इंडिया आघाडीला पाठिंबा देवून सर्वात प्रथम दिल्ली, पंजाब, हरियाणा, गुजरात, गोवा या ठिकाणी लोकसभेसाठी जागा घोषित करण्यात आल्या. घाबरलेल्या हुकूमशहाने हार पत्करावी लागेल या भावनेने केजरीवाल यांना अटक केली.
ॲड. विद्या शिंदे यांनी भाजप प्रणित मोदी सरकारला देशात हुकूमशाही प्रस्थापित करायची आहे, जनसामान्यांचे हक्क, मागण्या, अधिकार हिसकावून घ्यायचे प्रयत्न सुरु आहे. गणेश मारवाडे म्हणाले की, इलेक्टोरल बाँड ही सरळ सरळ खंडणी आहे, त्यामुळे महागाई, बेकारी देशात वाढली असल्याचे सांगितले. राजेंद्र सामल यांनी आपण आज रस्त्यावर उतरलो नाही, तर पुढील काळात सामाजिक असमतोल निर्माण होणार आहे. अनेक घोटाळे करणारे भाजपमध्ये आले व त्यांचे मित्र बनल्याने, त्यांना क्लीन चिट देवून त्यांच्या फायली बंद करण्यात केल्या आहेत, असा आरोप केला.
प्रकाश वडवणीकर यांनी जे घाबरले ते भाजपमध्ये गेले आणि जे त्यांच्या विरोधात उभे राहिले, त्यांच्यावर ईडी व इतर कारवाया मागे लावून त्यांच्यात दहशत निर्मण करण्यात आली. या दहशतीला आम आदमी पक्षाला घाबरणार नसून, सर्वसामान्य जनता या हुकूमशाहीला मत पेटीतून उत्तर देणार असल्याचे त्यांनी सांगितले.