Maratha Reservation ः मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे समर्थक सज्ज झाले आहेत. नगर दक्षिण लोकसभा मतदार संघातून चारशेवर जणांनी उमेदवारी दाखल करण्याची तयारी केली आहे. दरम्यान, मनोज जरांगे पाटील उद्या शनिवारी (23 मार्च) सकाळी 10 वाजता वांबोरीमध्ये (ता. राहुरी) व दुपारी 12 वाजता पारनेरला बैठक घेणार असून, यात याबाबत निर्णय होणार आहे.
सगेसोयरे निर्णयाच्या अंमलबजावणीसह मराठा आरक्षण मागणीसाठी मागील सहा-सात महिन्यांपासून मनोज जरांगे पाटील आंदोलने करीत आहेत. मात्र, आता लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू झाल्याने हा विषय राजकारण्यांनी बाजूला टाकल्यासारखा झाला आहे. या पार्श्वभूमीवर, मराठा आरक्षणाचा निर्णय होईपर्यंत लोकसभा निवडणूक होऊ नये यासाठी सकल मराठा समाज आक्रमक भूमिकेत आला आहे. प्रत्येक मतदार संघात शेकडोजणांनी उमेदवारी दाखल करून निवडणूक इव्हीएम मशीनऐवजी मतपत्रिकेवर (बॅलेट पेपर) करायला लावणे वा हजारोजणांनी अर्ज भरून निवडणूक रद्दच करायला लावण्याचे नियोजन सुरू केले आहे.
..तर, त्याला मग समर्थन
शेकडो वा हजारोजणांनी उमेदवारी अर्ज भरल्यावरही प्रशासनाने निवडणूक रद्द न करता मतपत्रिकेवर मतदान घेण्याची तयारी केली तर मग सकल मराठा समाजाची भूमिका निवडणूक लढवण्याची असेल व विजयासाठी आपल्यातील ताकदवान उमेदवाराचा जोरात प्रचार केला जाणार आहे. जेथे आपल्यातील कोणी ताकदवान नसेल, त्यावेळी प्रत्येक मतदार संघाचा विचार करून तेथील विजयी होऊ शकणार्या व ज्याने मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला, अशा स्थानिक कोणत्याही पक्षाच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याचाही विचार केला जाणार असल्याचे सांगण्यात आले.
चारशेवरजणांची नोंदणी
मराठा आरक्षणाचा निर्णय घेत नसल्याने सरकारला अद्दल घडवण्याच्या इराद्याने सकल मराठा समाजाने राज्यातील 48 मतदारसंघांतून हजारो उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तयारी सुरू केली आहे. नगर दक्षिण मतदार संघातही आतापर्यंत चारशेहून अधिकजणांनी नावनोंदणी केली आहे. यात पारनेर, राहुरी, शेवगाव, पाथर्डी, श्रीगोंदे व जामखेड येथील अनेकांचा पुढाकार आहे व यासाठी गावोगावी घोंगडी बैठका घेतल्या असल्याचे सकल मराठाचे समन्वयक गोरख दळवी यांनी सांगितले. जरांगे पाटील उद्या शनिवारी वांबोरी व पारनेर येथे यासंदर्भात बैठका घेणार असून, त्यावेळी सर्वांची मते जाणून घेतल्यावर ते रविवारी (24 मार्च) अंतरवाली सराटी येथे बैठकीत जो आदेश देतील, त्यानुसार अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, उमेदवारी अर्ज भरताना प्रत्येकाला 25 हजार रुपये भरावे लागणार आहेत. त्याचे नियोजन सुरू आहे. निवडणूक रद्द झाली तर हे पैसे परत मिळणार आहेत. मात्र, निवडणूक मतपत्रिकेवर झाली व पुरेशी मते मिळाली नाही तर हे पैसे जप्त होणार आहेत. तो धोका पत्करून उमेदवारी भरण्याची तयारी काहींनी सुरू केली आहे.
वाराणसीतही अर्ज भरणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसीमध्ये उमेदवारी करणार आहेत. या मतदारसंघातही महाराष्ट्रातून ऑनलाईन अर्ज दाखल करण्याचा विचार सुरू आहे. मराठा आरक्षणाबाबत मराठा समाजाच्या भावना पंतप्रधान मोदींपर्यंत पोहोचाव्यात, या हेतूने त्या मतदार संघात अर्ज दाखल केले जाणार असल्याचे सांगण्यात आले.