CSRD Social Work and Research Institute ः जागतिक समाजकार्य दिनाचे औचित्य साधून सीएसआरडी समाजकार्य व संशोधन संस्थेच्या माध्यमातून लोकाभिमुख समाज विकासाला प्रोत्साहित करण्यासाठी विशेष अभियान राबविण्यात आले. या अंतर्गत जिल्ह्यातील २५ हून अधिक गावांमध्ये तसेच विविध सामाजिक संस्था,सेवा वस्ती याठिकाणी विविध उपक्रम राबविल्याची माहिती सीएसआरडीचे संचालक डॉ. सुरेश पठारे यांनी दिली.
या दृष्टिकोनातून समन्वय समितीची बैठक नुकतीच पार पडली. डॉ. सुरेश पठारे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या समन्वय समितीच्या बैठकीला डॉ. सुरेश मुगुटमल, प्रदीप जारे, सॅम्युअल वाघमारे, नाजीम बागवान, श्रीकांत तलोकार यांच्यासह विद्यार्थी प्रतिनिधी उपस्थित होते. समाजकार्याचे राष्ट्रीय संघटन (नॅशनल असोशीएशन ऑफ प्रोफेशनल सोशल वर्क्रर्स इन इंडिया) यांचा सहयोगाने १९ मार्च ते ०२ एप्रिलपर्यंत मानवी संवेदना व सहसंबंध जोपासण्यासाठी तसेच पर्यावरण संवर्धन व हवामान न्याय याविषयावर विविध उपक्रम राबविण्यात येणार असून या उपक्रमात सीएसआरडी समाजकार्य महाविद्यालयाचे १८० विद्यार्थी, प्राध्यापक व कर्मचारी सहभागी होणार आहेत.
डॉ. पठारे म्हणाले, “इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ सोशल वर्कर या जागतिक समाजकार्य संघटनेच्या पुढाकारामुळे व युएनच्या मान्यतेने सन १९८३ पासून दरवर्षी मार्च महिन्याच्या तिसऱ्या मंगळवारी जागतिक समाजकार्य दिन जगभर साजरा केला जातो. जवळपास ११६ देश समाजकार्य दिनाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमात सहभागी होत असतात”. यावर्षी समाजकार्य दिनाचा मुख्य विषय “परिवर्तनीय बदलासाठी सामायिक भविष्य” हा आहे. सद्याच्या आव्हानाचा सामना करण्यासाठी समुदाय सक्षमतेवर भर देण्यात येत आहे. सध्या जागतिक स्तरावर बहुआयामी संकटे समोर आहेत. यात प्रामुख्याने अशांत वैश्विक स्थिती, हिंसक संघर्ष, पर्यावरणाचा ऱ्हास, आर्थिक, सामाजिक व राजकीय विषमता याबाबत सक्रीय भूमिका घेणारे नेतृत्व निर्माण करणे हि काळाची गरज आहे.
या दृष्टीने जमिनीस्तरावर लोकसहभागीता वाढविणे, स्थानिक ज्ञान व कुशलता यांना प्रोत्साहन देणे, सर्वसमावेशक सहिष्णूता, मानवी सहसंबधाचे प्राधान्य या मूल्यांच्या आधारे परिवर्तनीय बदलासाठी जगभरातील समाजकार्य कार्यकर्ते विशेष प्रयत्न करत आहेत. मानवी संवेदना विरोधी भुमीकांमुळे सामाजिक अस्तीरतेचे वातावरण पहावयास मिळत आहे. संभाव्य धोके ओळखुन शाश्वत विकासासाठी सामुहिक प्रयत्न करणे गरजेचे आहे. शाश्वत विकास करायचा असेल तर निसर्ग टिकला पाहिजे मनुष्य आत्मसन्मानाने जगाला पाहिजे त्यामुळे समुदायातील लोकांमध्ये या वैश्विक मूल्याबाबत साक्षरता निर्माण करण्यासाठी समाजकार्यकर्त्यांनी सातत्याने असे उपक्रम राबविले पाहिजे. त्यामुळे मानवता जपण्यासाठी ही लोकचळवळ म्हणून सामान्य लोकापर्यंत रुजवणे हि काळाची गरज झाली असून ख-या अर्थांने शाश्वत समृध्दीसाठी समाजकार्यकत्यांनी जमिनी स्तरावर भरीव कार्य करण्यात पुढाकार घेतला पाहजे असे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले.
त्यादृष्टीने सीएसआरडीने हाती घेतलेले हे विशेष अभियान महत्वपूर्ण ठरणार असून याद्वारे लोकशिक्षण व जनजागृती यावर विशेष भर देण्यात येत आहे. या अभियानाचा समारोप ०२ एप्रिल रोजी सीएसआरडी राष्टीय परिषदेने होणार आहे. यामध्ये मानवी संवेदना व सहसंबंध जोपासण्यासाठी तसेच पर्यावरण संवर्धन व हवामान न्याय क्षेत्रात समाजकार्यकर्त्यांनी केलेल्या अभिनव उपक्रमाचे सादरीकरण करण्यात येणार आहे. या क्षेत्रात विशेष योगदान देणाऱ्या स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, कार्यकर्ते यांचा सन्मान करण्यात येणार आहे. या परिषदेमध्ये परिवर्तनीय बदलासाठी सामायिक भविष्य व शाश्वत विकासाच्या अनुषंगाने समाजकार्यकर्त्याचे धोरण यावर विचारमंथन करण्यात येणार असून विविध क्षेत्रातील तज्ञ व प्रतिनिधी यामध्ये सहभागी होणार आहे.