New Arts College : नगर शहरातील न्यू आर्टस महाविद्यालयामध्ये मंगळवारी (19 मार्च) दुपारी सव्वाचारच्या सुमारास एका युवतीला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करून बांधून ठेवण्याची घटना घडली आहे. या प्रकरणी तोफखाना पोलिसांनी संबंधित मुलीच्या फिर्यादीवरून अनोळखी सहाजणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकारामुळे नगर शहरातील शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे. दरम्यान, घटनेबाबत तोफखाना पोलिसांना वेगळीच शंका आहे.
संबंधित युवती मंगळवारी दुपारी सव्वा चारच्या सुमारास कॉलेजमध्ये एकटीच असताना अनोळखी सहाजणांनी संगनमताने तिचा हात पकडला. तिच्या पोटात लाथा मारल्या. तसेच दरवाजाला लावलेला दगड हातात घेऊन तिच्या डोक्यात मारून तिला जखमी केले. मारहाण करताना मुलीने प्रतिकार केला. त्यावर केस करके तुमने गलती कर की, असे मारहाण करणारे युवक म्हणत होत. मारहाणीनंतर या युवकांनी स्कार्फने हात-पाय बांधून ठेवल्याचे युवतीने फिर्यादीत म्हटले आहे.
ही घटना कॉलेजमधील काही प्राध्यापकांनी पाहिल्यावर पोलिसांना फोन केला होता. त्यानंतर पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेतली. जखमी झालेल्या संबंंधित युवतीला जवळच असलेल्या खासगी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले गेले आहे. या घटनेची नगर शहरात जोरदार चर्चा असून, शहरातील विविध संघटनांमध्ये अस्वस्थता असल्याचे समजते. पोलिसांद्वारे युवतीला मारहाण करणार्या अनोळखी व्यक्तींचा शोध सुरू करण्यात आला आहे. या युवतीला मारहाण का झाली व कोणी केली याबाबतची माहिती अजून स्पष्ट झालेली नाही.
जखमी युवतीला पोलिसांनी विचाराणा केल्यावर तिने माहिती दिली. त्यानुसार मारहाण करणारे युवकांपैकी एकाच्या हातावर राऊंड रिंग असे गोंदलेले होते. तसेच एका मुलाने कुर्ता घातला होता. बाकीच्यांनी शर्ट-पॅंट घातलेली होती. पोलिसांनी युवतीकडे आणखी बारकाईने चौकशी केल्यावर त्यात विसंगती आढळत आहे. त्यामुळे प्रकाराचे गौडबंगाल वाढले आहे. दरम्यान, या युवतीची पूर्वी देखील तक्रार आहे. या तक्रारीच्या अनुषंगाने देखील पोलिसांनी चौकशी केली. युवतीच्या मारहाणीच्या तक्रारीचा आणि जुन्या तक्रारीचा संबंध नसल्याचे आढळल्याची माहिती पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांनी दिली.
दरम्यान, या प्रकाराची पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी गंभीर दखल घेतली. शहर पोलीस उपअधीक्षक अनिल भारती यांच्यासह ते तोफखाना पोलीस ठाण्यात या घटनेची माहिती घेण्यासाठी तळ ठोकून होते. राकेश ओला यांनी या प्रकारामागील सत्य शोधूनच काढा, अशा सूचना तोफखाना पोलिसांना दिल्या आहेत.