Pundalik Maharaj Jungle Shastr ः वारकरी संप्रदायातील अध्यात्मिक व वैचारिक बैठकीमुळे आपली भारतीय संस्कृती आजही ताठ मानेने जगात टिकून आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. परम पूज्य गुरुवर्य पुंडलिक महाराज जंगले शास्त्री यांच्या अमृत महोत्सवानिमित्त ज्ञानेश योग आश्रम डोंगरगणच्यावतीने आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाच्या सांगता समारंभ प्रसंगी दूरदृश्य प्रणाली द्वारे ते बोलत होते.
परमपूज्य गुरुवर्य पुंडलिक महाराज जंगले शास्त्री, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार सुजय विखे पाटील, नगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले, राहुरीचे आमदार प्राजक्त तनपुरे, ज्येष्ठ नेते सुभाष पाटील, शिवसेना शिंदे गटाचे नगर जिल्हाध्यक्ष बाबुशेठ टायरवाले, भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अक्षय कर्डिले, जंगले महाराज शास्त्री यांचे उत्तराधिकारी भागवत महाराज जंगले आदी यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, “भारतीय संस्कृतीवर आत्तापर्यंत अनेक अतिक्रमणे झाली. परंतु ही सर्व अतिक्रमणे आपण परतावून लावली. म्हणून भारतीय संस्कृती संपली नाही तर आजही टिकून आहे. त्यामध्ये वारकरी संप्रदायातील अध्यात्मिक व वैचारिक बैठक, आणि संस्कार हे कारणीभूत आहेत. वारकरी संप्रदायामुळेच आजही समाजामध्ये एकोपा टिकून आहे. आपल्या देशातील, धर्म, परंपरा आणि संस्कृती टिकून आहे. याच परंपरेचे पाईक असलेले गुरुवर्य पुंडलिक महाराज जंगले शास्त्री हे आज आपल्या सोबत आहेत आणि आपण सर्वजण त्यांचा अमृत महोत्सव साजरा करीत आहात ही अतिशय आनंदाची व समाधानाची घटना आहे. या निमित्ताने झालेल्या अखंड हरिनाम सप्ताह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या सर्व वारकरी मंडळींचे मी स्वागत करतो”. मला डोंगरगण येथे या कार्यक्रमासाठी येऊन महाराजांचे आशीर्वाद घ्यायचे होते. परंतु अति महत्त्वाच्या कामामुळे मला ते शक्य झाले नाही. मात्र भविष्यात मी नक्की डोंगरगणला येऊन आश्रमाला भेट देईल व महाराजांचे आशीर्वाद घेईल. महाराजांनी आयुष्यभर भजन, कीर्तन, प्रवचनाद्वारे लोकप्रबोधन केले. ज्ञानार्जनाची काम केले आणि महाराष्ट्रात कीर्तनकारांच्या अनेक पिढ्या घडवल्या. त्यांना दीर्घायुष्य व उत्तम आरोग्य लाभावे, अशी प्रार्थना मी ईश्वराकडे करतो असे ते म्हणाले.
पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी श्रीक्षेत्र डोंगरगण परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी पर्यटन विकास आराखड्याच्या योजनेनुसार भरीव निधी उपलब्ध करून दिला जाईल. डोंगरगण बरोबरच जिल्ह्यातील सर्व धार्मिक पर्यटन स्थळांचा विकास आपण करणार आहोत. धार्मिक पर्यटनामुळे जिल्ह्यातील तरुणांना रोजगार मिळेल. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काशी विश्वेश्वराचा कॉरिडोर पूर्ण केला. तो आज जगात प्रसिद्ध आहे. आता आपण नाशिक त्रंबकेश्वर चा कॉरिडॉर पूर्ण करणार आहोत. श्री क्षेत्र नेवासा येथील ज्ञानेश्वर मंदिर परिसराच्या विकासासाठी २०० कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून लवकरच ही विकास कामे सुरू होतील. महाराष्ट्र शासनाने चंद्रभागा नदीची स्वच्छता केली. शिर्डी, बेलवंडी येथे शेकडो एकर जमीन एमआयडीसीसाठी हस्तांतरित केली. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व संरक्षण मंत्री अमित शहा यांच्या आशीर्वादाने व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनामुळे मला राज्याचा महसूल मंत्री म्हणून काम करण्याची संधी आपल्या सर्वांच्या आशीर्वादामुळे मिळाली. ही ऊर्जा मी भविष्यात समाजसेवेसाठी वापरेल असे सांगितले.
खासदार सुजय विखे यांनी पुंडलिक महाराज जंगले शास्त्री यांच्यासारखे व्यक्तिमत्व ही आज समाजाची गरज आहे. महाराजांसारखे व्यक्तिमत्व जोपर्यंत आपल्या सोबत आहे तोपर्यंत आपण सर्वजण सुरक्षित आहोत. त्यांच्या मधुर वाणी द्वारे त्यांनी समाज प्रबोधन. त्याचबरोबर सर्व समाजाला एकत्रित ठेवण्याचे काम ते गेल्या ५० वर्षांपासून करीत आहेत. वारकरी संप्रदायातील विद्यार्थ्यांना आणि महाराष्ट्रातील सर्वांना आध्यात्मिक व वैचारिक दिशा देण्याचे काम भविष्यात देखील त्यांच्या हातून होईल, अशी भावना व्यक्त केली.
बाळासाहेब खेत्रे यांनी प्रास्ताविक केले. डोंगरगणचे सरपंच सर्जेराव मते, मांजरसुंबाचे सरपंच जालिंदर कदम, राधाकिसन भुतकर, शिवाजीराव चव्हाण, महेश मडके, किशोर गडाख, लक्ष्मण कदम, महेश घाडगे, ईश्वर कदम, हरिदास पालवे आदींनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले. सोमनाथ वामन यांनी सूत्रसंचालन केले. संदीप गवांदे यांनी आभार मानले.