Nagar News : नगर अर्बन बॅंकेचा गैरव्यवहार प्रकरणाचा तपास चांगला गाजत आहे. दाखल गुन्ह्यात आतापर्यंत दहा जणांना अटक झाली आहे. नगर अर्बन बॅंक बचाव कृती समिती गैरव्यवहार प्रकरणाचा पाठपुरावा करत आहे. यातच बॅंकेच्या गैरव्यवहाराची समाज माध्यमांवर व्हायरल झालेली पोस्ट आणि त्याखालील कमेंट चर्चेत आल्या आहेत. बॅंकेच माजी संचालक तथा बॅंक बचाव कृती समितीचे प्रमुख राजेंद्र गांधी यांची पोस्ट आहे. ही पोस्ट व्हायरल होण्याबरोबर बॅंक अडचणीत आणणाऱ्यांना चिंतन करायला देखील लावणारी आहे.
ज्या बँकेत, अरे दोन लाख कशाला पाहिजेत? एक लाखात काम चालेल तुझे… कशाला जास्त व्याज भरतो..?, असे संचालक व पदाधिकारी सांगायचे. तीच बँक दुर्दैवाने 2014 पासून एक भ्रष्टाचारी चेअरमन आणि त्यांच्या भ्रष्टाचारी टोळक्यांच्या ताब्यात गेली. यानंतर कर्जदारांना सांगितले जायचे, अरे दोन कोटी काय घेतोस… घे 10 कोटी! पण, फक्त आम्हाला काहीतरी दे! अशी ही पोस्ट आहे. राजेंद्र गांधी यांची पोस्ट समाज माध्यमांमध्ये व्हारयल होताच, त्याखाली प्रतिक्रियांची लाट उसळली आहे. ही पोस्ट शेअर देखील केली जात आहे. प्रतिक्रियांमध्ये बॅंक बुडत चालल्याचे पाहून संतप्त प्रतिक्रियांमधून उमटत आहेत.
गैरव्यवहारामुळे नगर अर्बन बँकेचा व्यवसाय परवाना रिझर्व्ह बॅंकेने रद्द करून सहा महिने झाले आहेत. तो पुनरुज्जीवित होण्याची शक्यता धुसरच आहे. दुसरीकडे पोलिसांनी फॉरेन्सिक ऑडिटच्या आधारे बँकेचे माजी अध्यक्ष, दोन माजी संचालकासह सुमारे दहा जण जेलची हवा खात आहे.
रावबहाद्दूर चितळे, भाऊसाहेब फिरोदिया, मोतीभाऊ फिरोदिया, नवनीतभाई बार्शीकर, झुंबरलाल सारडा, सुवालाल गुंदेचा यांनी नगर अर्बन बँकेवर त्यांच्या काळात एकहाती वर्चस्व गाजविले. परंतु हे सर्व कर्जदाराला जबाबदारीची जाणिव करून द्यायचे. परंतु दुर्दैवाने 2014 पासून एक भ्रष्टाचारी चेअरमन आणि त्याच्या भ्रष्टाचारी टोळक्याच्या ताब्यात बँक गेली. यानंतर कर्जदारांना सांगितले जायचे, अरे, दोन कोटी काय घेतोस? 10 कोटी घे! फक्त आम्हाला काहीतरी दे.., असे स्पष्ट करून या पोस्टमध्ये राजेंद्र गांधी यांनी म्हटले आहे की, यांना काहीतरी देणारे कर्जदार आणि त्यांना आणणार्या दलालांना मोठे कमिशन दिले जायचे. चिंचवड शाखेत 22 कोटीचे बोगस कर्ज आणून त्या 22 कोटीतील 11 कोटी यांना देणारा कर्जदार शोधून आणला म्हणून एका दलालाला तब्बल 75 लाखाची बक्षिसी दिली होती.आता ही बक्षिसी खात्यात ट्रान्सफर झाली म्हणून कळली. जे कमिशन रोख दिले जायचे, ते कसे कळणार? 300 कोटीच्या घोटाळ्यात 72 कोटी रुपये रोखीने गायब झाले आहेत…, असे परखड भाष्य राजेंद्र गांधींनी या पोस्टमध्ये केले आहे.
चिंचवड शाखा 1.39 कोटीचे तारणावर 22 कोटी कर्ज, त्यापैकी 11 कोटी लगेचच हडप, राहाता शाखा 12 कोटीचे कर्ज त्यापैकी 8 कोटी लगेचच हडप, जालना शाखा 4.85 कोटीचे कर्ज व संपूर्ण रक्कम हडप, रोजंदारीवर काम करणार्या गवंडीच्या नावावर विनातारण तीन कोटीचे कर्ज व पूर्ण तीन कोटी हडप, शेवगाव शाखा 5.30 कोटी बनावट सोनेतारण कर्जाची संपूर्ण रक्कम हडप, चेअरमनला 20 लाख रुपये लाच आणि लगेचच तीन कोटीचे कर्ज. मात्र वसुली शून्य, चेअरमनची फॅक्टरी बंद पडली. चार कोटीचे कर्ज देवून दुसर्याच्या गळ्यात मारली आणि बँकेला अडकविले.., अशी टोटल मारली तर खूप मोठी आहे. वसुलीची शक्यता शून्य. संचालकांच्या मालमत्ता विकूनच ठेवीदारांना पैसे मिळू शकतात, असेही राजेंद्र गांधीं यांनी पोस्टमध्ये नमूद केले आहे.