Nagar News : महाराष्ट्रात वकील संरक्षण कायदा लागू करण्यासाठी पाठपुरावा करणार असून, त्याच्या मंजुरीसाठी कायदामंत्री व मुख्यमंत्री यांना तातडीने पत्र पाठविणार असल्याचे आश्वासन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिले.
नगर बार असोसिएशनच्या शिष्टमंडळाने दिल्ली येथे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आठवले यांच्या निवासस्थानी भेट घेवून त्यांच्याकडे महाराष्ट्रात वकील संरक्षण कायदा लागू होण्यासाठी पाठपुरावा करण्याची मागणी केली. यावेळी ॲड. महेश शिंदे, सुहासराव सोनवणे, पोपटराव बनकर, रावसाहेब मगर, बाबू काकडे आदी उपस्थित होते.
राहुरी येथे घडलेल्या ॲड. राजाराम आढाव व त्यांची पत्नी ॲड. मनीषा आढाव यांचे अपहरण करून करण्यात आलेल्या हत्या प्रकरणाचा मंत्री रामदास आठवले यांनी निषेध व्यक्त केला. ॲड. महेश शिंदे यांनी कर्नाटक, राजस्थान या राज्यात वकील संरक्षण कायदा लागू आहे. महाराष्ट्रमध्ये मागील प्रदीर्घ वर्षापासून वकिलावर हल्ले, खून, खंडणी, बलात्कार, धमकी, मारहाण असे गंभीर स्वरूपाचे प्रकार सातत्याने घडत आहे. भविष्यात असे निंदनीय प्रकार घडू नये, वकिलांना संरक्षण मिळावे व लोकशाहीचे रक्षण व्हावे यासाठी अहमदनगर बार असोसिएशनच्या वतीने जिल्ह्यात करण्यात आलेल्या आंदोलनाची माहिती त्यांनी दिली.
सुहासराव सोनवणे यांनी सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी व अन्याय होणाऱ्या व्यक्तीच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या वकिलांना संरक्षण मिळाले पाहिजे. न्याय व्यवस्था टिकून राहण्यासाठी वकील बांधव महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यासाठी महाराष्ट्र सरकारने आचारसंहितेपूर्वी वकील संरक्षण लागू कायदा लागू करावा अशी मागणी त्यांनी केली.