Nagar Political : राष्ट्रवादी काॅंग्रेसचे आमदार नीलेश लंके हे आज राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार असल्याचे वृत्त तथ्यहीन निघाले आहे. शरद पवार यांनीच हा विषय एका वाक्यात संपवला आहे. शरद पवार यांची आज सकाळी पत्रकार परिषद झाली. यात त्यांनी ‘त्या चर्चेला अर्थ नाही. तथ्यहीन आहेत. असे अनेक लोकं आहेत. त्यांना विचारात बसणार का?, अशा शब्दात फटकारले. त्यामुळे आमदार नीलेश लंके यांच्या राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षातील प्रवेशाचा राजकीय संभ्रम कायम राहिला आहे.
आमदार नीलेश लंके हे राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार असल्याचे चर्चा आहेत. तशी वातावरण निर्मिती देखील झाली आहे. तशी ती केली जात असल्याचे देखील दिसते. आमदार लंके देखील यावर थेट भाष्य करत नसल्याने या चर्चेला अधिक बळ मिळत आहे. यातच त्यांचा महायुतीपेक्षा महाविकास आघाडीतील नेत्यांबरोबर वावर वाढला आहे. तसेच भाजप नेते मंत्री राधाकृष्ण विखे आणि खासदार सुजय विखे यांचे विरोधकांबरोबर देखील मैत्री आणि जवळीक वाढली आहे. भाजप पक्षातील विखे विरोध नेते देखील आमदार लंकेंच्या जाहीरपणे संपर्कात आहेत. त्यामुळे शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण येत आहे.
आमदार नीलेश लंके यांनी त्यांच्या पारनेरमधील नीलेश लंके प्रतिष्ठानमार्फत नगरमध्ये मार्चच्या पहिल्या आठवड्यात ‘शिवपुत्र संभाजी’ हे महानाट्य घेतले. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर हे महानाट्य घेतल्याने आमदार लंके हे नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी करणार या चर्चांना बळ मिळाले. तसेच या महानाट्याचे प्रमुख अभिनेता खासदार अमोल कोल्हे हे देखील राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षात आहे. त्यांनी देखील या महानाट्याच्या व्यासपीठावरून आमदार लंके यांनी दिल्लीत महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची तुतारी फुंकावी, अशी साद घातली. यामुळे आमदार लंके यांच्या पक्षप्रवेश निश्चित आहेत, अशी अटकळ बांधली जाऊ लागली.
महानाट्याच्या कार्यक्रमानंतर आमदार नीलेश लंके यांनी काल वाढदिवस अगदी साध्यापद्धतीने साजरा केला.आमदार लंके यांच्या कार्यकर्त्यांनी पुन्हा टायमिंग साधत दिल्ली अब दूर नही.., अशा स्वरूपाची जाहिरातबाजी केली. आमदार लंके हे काल वाढदिवस साजरा करत नाही तोच, ते आज सकाळी पुण्याच्या दिशेने रवाना झाले. याच दरम्यान, पुण्यात शरद पवार यांनी पत्रकार परिषद बोलावली. त्यामुळे आमदार लंके हे राष्ट्रवादी काॅग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार असल्याच्या वृत्ताला बळ मिळाले. तसे वृत्तवाहिन्यांनी देखील वृत्त चालवले. परंतु हे वृत्त काही शरद पवार यांच्या पत्रकार परिषदेतील भाष्याने तथ्यहीन ठरले.
शरद पवार म्हणाले, “आमदार नीलेश लंके यांच्या पक्ष प्रवेशाची चर्चा तुमच्याकडून (पत्रकारांकडून) समजली. या चर्चेला अर्थ नाही. तथ्यहीन आहे. असे अनेक लोकं आहेत. त्यांना विचारात बसणार का?, नीलेश लंकेच्या प्रवेशांची मला माहिती नाही. हे देखील आजच तुमच्याकडून कळाले. गेलेले संपर्कात आहे की नाही, या उद्योगात आम्ही नाही. अनेक लोक, असे आहेत की, हे जे काही चालेले आहेत, ते त्यांना योग्य वाटत नाही. ते अस्वस्थ आहेत”.