Nashik ACB Trap : गुन्ह्यात आरोपी न करून घेण्यासाठी १२ हजार रुपयांची लाच घेताना दोन पोलीस कर्मचारी सापडले आहेत. लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या नाशिक पथकाने ही कारवाई केली. कोपरगाव पोलीस ठाण्यात काल रात्री ही कारवाई झाली. पोलीस हवालदार संतोष रामनाथ लांडे आणि पोलीस शिपाई राघव छबुराव कोतकर या दोघांविरुद्ध लाच स्वीकारताना कारवाई करण्यात आली आहे.
तक्रारदार यांच्याविरोधात कोपरगाव पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याचा तपास पोलीस हलवादार लांडे याच्याकडे आहे. या गुन्ह्याच्या तक्रारीत आरोपी न करण्यासाठी तक्रारदाराला पोलीस हवालदार लांडे याने पोलीस शिपाई कोतकर याला भेटून माझ्याकडे ये, असे सांगितले. तक्रारदार हे कोतकर याला भेटले. कोतकर याने तक्रारदाराला गुन्ह्यात आरोपी व्हायचे नसेल, तर १५ हजार रुपये लाचेची मागणी केली.
तक्रारदार याने यावर लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या नाशिक पथकाकडे तक्रार केली. तक्रारदाराच्या तक्रारीत तथ्या आहे का, याची पडताळणी पथकाने केली. यानंतर गुरूवारी सायंकाळी कोपरगाव पोलीस ठाणे परिसरात पथकाने सापळा लावला. तक्रारदाराकडून तडजोडीनंतर या दोघांनी १२ हजार रुपये घेण्याचा ठरवले. कोपरगाव पोलीस ठाण्यात सीसीटीएनएस कक्षात तक्रारदाराकडून १२ हजार रुपये घेताना या दोघांना पकडण्यात आले. या दोघांविरुद्ध कोपरगाव पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत कारवाई सुरू होती.
नाशिक परिक्षेत्राचे लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे, पोलीस कर्मचारी प्रफुल्ल माळी, सचिन गोसावी यांचे पथक कारवाईत सहभागी होते.