Nagar News : नगर शहरातील हिंद सेवा मंडळाचे सभासद दीप चव्हाण, वसंत लोढा, संजय घुले, अनिल गट्टाणी व हेमंत मुळे हे मंडळाला अडचणीत आणण्यासाठी काम करणारे सभासद आहेत. गेल्या 100 वर्षांपासून शैक्षणिक क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या हिंद सेवा मंडळावर खोटे आरोप करीत बदनाम करीत आहेत. त्यांनी संस्थेच्या चेंज रिपोर्टबाबत केलेला आरोप चुकीचा असून, अद्याप तो न्यायप्रविष्ट आहे. हिंद सेवा मंडळाची झालेली निवडणूक बेकायदेशीर असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. मात्र, उच्च न्यायालयाने दाखल केलेल्या याचिकेत हस्तक्षेप न करण्याचा निकाल दिल्याने मंडळाची निवडणूक घेण्याचा मार्ग मोकळा झाल्यानेच संस्थेची बिनविरोध निवडणूक झाली आहे.
हिंद सेवा मंडळावर आरोप करणाऱ्या पाचही जणांचा उद्देश संस्थेचा कारभार विस्कळीत करण्याचा आहे. संस्थेची विद्यार्थी गृहाची जागा ही वक्फ बोर्डाची असल्याचे सांगत सिद्ध करण्याचा प्रयत्न केला जात आहे. प्रत्यक्षात वक्फ बोर्डाचा व त्या जागेचा काही एक संबंध नाही. वसंत लोढा हे सदर जागा वक्फ बोर्डाच्या घशात घालण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यामुळे ते वक्फ बोर्डाचे एजंट म्हणून काम करीत आहेत की काय, असा प्रश्न हिंद सेवा मंडळाचे कार्याध्यक्ष ॲड. अनंत फडणीस यांनी उपस्थित केला आहे. शहरातील ताबेमारी दूर करण्यासाठी संपर्क करण्याचे आवाहन वसंत लोढा यांनी पत्रकार परिषदेत केले होते. हिंद सेवा मंडळाच्या शहरात असलेल्या पाच ते सहा जागांवर ताबेमारी झालेली आहे. वसंत लोढा यांनी पुढाकार घेऊन ही ताबेमारी दूर करून संस्थेला त्या जागा पुन्हा मिळवून द्याव्यात. नगर शहरातील ताबेमारी कमी करण्याच्या कामास त्यांनी येथून सुरुवात करावी, असेही आवाहन फडणीस यांनी पत्रकार परिषदेत केले.
एकीकडे भारतीय जनता पक्षाचे केंद्रातील सरकार व खासदार वक्फ कायदा रद्द करण्यासाठी प्रयत्नशील असताना भाजपचे नेते वसंत लोढा हे वक्फ बार्डाचे एजंट म्हणून काम करतात, हा मोठा विपर्यास आहे. याबाबत भारतीय जनता पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे रितसर तक्रार करणार आहे. दीप चव्हाण, वसंत लोढा, संजय घुले, अनिल गट्टाणी व हेमंत मुळे यांनी वैयक्तिक माझ्यावर मोठ्या प्रमाणात खोटे आरोप केले आहेत. त्यांनी ते सिद्ध करावे, असे आवाहन त्यांना मी करतो. त्यांनी केलेल्या बदनामीच्या विरोधात मी त्यांच्यावर प्रत्येकी 50 लाखाचा अब्रु नुकसानीचा दावा करीत आहे, असे ॲड. फडणीस म्हणाले.
अध्यक्ष प्रा. शिरीष मोडक म्हणाले की, संस्थेच्या सदरच्या जागेसाठी ५० कोटी रुपये देणारा बिल्डर एक महिन्यात मिळवून देतो, असे वसंत लोढा यांनी सर्वसाधारण सभेत जाहीर करून तसे पत्र एक महिन्यापूर्वी दिले. आम्ही त्यांच्या प्रस्तावाची वाट पाहत आहोत. मात्र, अद्याप त्यांचा कोणताही प्रस्ताव मंडळापुढे आलेला नाही. उलट हिंद सेवा मंडळ करीत असलेल्या व्यवहाराविरोधात आम्हाला त्यांनी नोटीसा पाठवल्या आहे. संस्थेची आर्थिक परिस्थिती बिकट असताना या व्यवहारामुळे हिंद सेवा मंडळाला 25 कोटी रुपयांचा फायदा होणार आहे. संस्थेच्या हितासाठीच आम्ही हा निर्णय घेतला आहे. मात्र हिंद सेवा मंडळाच्या सभासदांकडून संस्थेचे हित न बघता संस्थेला बदनाम करण्याचे कट कारस्थान रचले जात आहे.
सचिव संजय जोशी म्हणाले की, हिंद सेवा मंडळाचा कारभार हा पूर्णपणे कायदेशीर व पारदर्शी पद्धतीने सुरू आहे. यामध्ये कोणीही हस्तक्षेप करू नये. त्यांना विधानसभा निवडणूक लढवायची असल्याने निवडणूक डोळ्यासमोर ठेवून ते जगतापांवर निशाणा साधत आहेत. मात्र हिंद सेवा मांडला हे राजकीय पक्ष नाहीये. वसंत लोढा यांनी राजकीय द्वेषाने संस्थेवर बिनबुडाचे आरोप करणे थांबवावे. यावेळी हिंद सेवा मंडळाचे कार्यकारिणी सदस्य सुमतीलाल कोठारी, जगदीश झालानी, ज्योती कुलकर्णी, रणजित श्रीगोड, बी. यू. कुलकर्णी आदी उपस्थित होते.