Nagar News : संगमनेर भाजप मध्ये संघटनात्मक धुसफूस उफाळून आली आहे. तालुका कार्यकारिणी नुकतीच तीन महिन्यांपूर्वी पक्षश्रेष्ठींच्या मार्गदर्शनाखाली जाहीर करण्यात आली होती. संगमनेर तालुक्यातील सर्वसमावेशक सामाजिक समरसता असलेली कार्यकारिणीचे सर्वच पक्षश्रेष्ठींनी अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या होत्या. मात्र दोन महिन्यातच काही नव्या व जुन्या कार्यकर्त्यांमध्ये शीतयुद्ध सुरू झाले. कर्मचारी व कार्यकर्ता, असा रोष घुसमटू लागला त्याच राज्याच्या नेत्यांपर्यंत या घटनेचे लोण पोहचले आणि सुंसघटीत पक्ष संघटनेला दृष्ट लागली.
संगमनेर तालुक्याचे अध्यक्ष वैभव लांडगे यांच्यासह कार्यकारिणी रद्द करण्याचा निर्णय उत्तर नगर जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे यांनी घेतला होता. तसे पत्र वैभव लांडगे यांना पाठवले होते. परंतु लगेच विठ्ठलराव लंघे यांनी पुन्हा वैभव लांडगे यांना पत्र देत संगमनेर कार्यकारिणी रद्दच्या निर्णयाला स्थगिती दिली. या दरम्यान, वैभव लांडगे यांचे वरिष्ठ नेते व प्रदेश महामंत्री विक्रांत पाटील यांच्याशी चर्चा झाली आणि संगमनेर तालुक्यात कार्यकारिणीत घडलेला घटनांचा सविस्तर अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या. यानंतर विठ्ठलराव लंघे यांनी कार्यकारिणी रद्द करण्याचा निर्णयाला स्थगिती दिली.
नगर जिल्ह्याचे तथा राज्याचे महत्वाचे मानले जाणारे नेते यांनीही “कान भरो” कर्मचाऱ्यांवर विश्वास दाखवत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील हेवेदावे समोर आणले. बुथ पातळीवरील एका कार्यकर्त्याला राजीनामा देण्यासाठी दबाव टाकला. तसा दबाव टाकूनही राजीनामा देत नाही. म्हणून चक्क तालुकाध्यक्ष यांना संपूर्ण कार्यकारिणी बरखास्त करण्यासाठी दबाव टाकण्यात आला. मात्र प्रदेश कार्यालयातून या निर्णयाला स्थगिती मिळाली आहे. यामुळे तालुक्यातील जुन्या कार्यकर्त्यांना दिलासा मिळाला तर नव्या कार्यकर्त्यांनी थेट महत्वाच्या पदावर असलेल्या नेत्याला मान खाली घालायला लावली जात असल्याची चर्चा संगमनेर भाजप कार्यकर्त्यांमध्ये रंगली आहे.
भाजप पक्ष संघटन समजून घेण्यासाठी जुन्या कार्यकर्त्यांनी अनेक केडर शिबिराचां लाभ घेतला आहे. मात्र नव्यानेच पक्षात आलेल्या नेत्यांना व त्यांच्या कार्यकर्त्यांना व्यक्तिनिष्ठ राजकारणांचे धडे शिकवले जातात. यामुळे पक्षनिष्ठेपेक्षा व्यक्तिनिष्ठ कार्यकर्त्यांची संख्या अधिक वाढत चालली खरी, पंरतु ही पद्धत येणाऱ्या लोकसभा, जिल्हा परिषद, नगरपालिका निवडणुकीत पुन्हा एकदा नेत्यांना मान खाली घालवायला लावेल, असेच चित्र सध्या निर्माण झाले आहे.