Education News ः नगर शहरातील चांद सुलताना हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये अनियमित पध्दतीने होत असलेल्या शिक्षकभरती प्रक्रियेत हस्तक्षेप करावा. पारदर्शकपणे प्रक्रिया पूर्ण करावी. तसेच भरतीमध्ये झालेल्या अनागोंदी संदर्भात नेमलेल्या चौकशी समितीने तातडीने अहवाल सादर करण्याच्या मागणीसाठी जिल्हा परिषद समोर अल्पसंख्याक कला शिक्षक संघाच्यावतीने उपोषण करण्यात आले.
या उपोषणात तक्रारदार निकहत परवीन मूर्तुझा खान कुटुंबियांसह स्मिता नाईक, संध्या मेढे, देविदास पंडित, युनूस तांबटकर, भैरवनाथ वाकळे, संतोष गायकवाड, प्रतीक बारसे, राजेंद्र कर्डिले, रविंद्र सातपुते, इमरान खान, फिरोज शेख, हनीफ शेख, अन्वर शेख आदी सहभागी झाले होते.
नगर शहरातील अंजुमन-ए-तरक्की-ए-उर्दू ट्रस्ट संचलित चांद सुलताना हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या तीन रिक्त पदांसाठी शिक्षक भरतीची एकच जाहिरात वृत्तपत्रांमध्ये दोनदा देण्यात आली. दुसऱ्या जाहिरातीमध्ये एक मजकूर गाळण्यात आला. १६ नोव्हेंबर रोजीच्या शिक्षक भरतीसाठी राज्यभरातून उमेदवार आले होते. त्यामध्ये शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरू झाली. सर्वप्रथम लेखी परीक्षा घेण्यात आली, या लेखी परीक्षेमध्ये उमेदवारांना शाळेच्या हॉलमध्ये बसविण्यात आले. परीक्षे दरम्यान संस्थेतील काही पदाधिकार्यांच्या नातेवाईकांनी मोबाईल स्वत: जवळ ठेवून परीक्षा दिली. याप्रकरणी पर्यवेक्षक व मुख्याध्यापकाकडे तक्रार करुन देखील त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. यावेळी उपस्थित उमेदवारांनी याप्रकरणी तक्रार अर्ज लिहून मुख्याध्यापककडे दिला असता मुख्याध्यापकने तो अर्ज घेतला नाही. चेअरमनकडे देण्याचे सांगितले. चेअरमननेही तो अर्ज स्वीकारण्यास मनाई केली. ज्या विरोधात तक्रार केली जात आहे, तो उमेदवार सदर शाळेत माध्यमिक विभागांमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत असल्याचा आरोप उपोषणकर्त्यांनी केला आहे.
चांद सुलताना हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये अनियमित पध्दतीने होत असलेल्या शिक्षकभरती प्रकरणी तक्रारी प्राप्त झाल्याने शिक्षण विभागाने चौकशी समिती नेमली आहे. या चौकशी समितीने ३१ जानेवारी २०२४ पर्यंत अहवाल देणे अपेक्षित होते, परंतु आजपर्यंत अहवाल देण्यात आलेला नाही. अहवाल देण्यास दिरंगाई होत असताना सर्व प्रक्रियेसाठी बंधन निश्चित करावे व संस्थाचालक ही अपूर्ण राहिलेली प्रक्रिया रद्द करू पाहत आहे. ही प्रक्रिया शिक्षण विभागाने हातात घेऊन पारदर्शक पद्धतीने शिक्षक भरती करून न्याय देण्याची मागणीसाठी उपोषण करण्यात आले.