Nagar Urban Bank ः नगर अर्बन मल्टीस्टेट-शेड्यूल्ड बँकेतील आर्थिक घोटाळ्यातील आणखी एक कर्जदार अविनाश प्रभाकर वैकर (वय ६२, रा. रासनेनगर, सावेडी, अहमदनगर) याला नगर शहर पोलीस उपअधीक्षक अमोल भारती यांच्या पथकाने रविवारी मध्यरात्री अटक केली. उपअधीक्षक संदीप मिटके यांच्या बदलीमुळे काहीसा थंडावलेला या प्रकरणाचा तपास आता पुन्हा सुरू झाला आहे. त्यामुळे फरार असलेल्या आरोपींचा शोध लागण्याची ठेवीदारांची आशा पल्लवीत झाली आहे.
कर्जदार अविनाश वैकर याला उपनिरीक्षक निसार शेख यांच्या पथकाने ही कारवाई केली. तो बँकेचा कर्जदार असल्याचे सांगण्यात येते. त्याला सोमवारी दुपारी न्यायालयात नेणार आहेत. त्यावेळी बँक बुडवण्यात त्याची काय भूमिका आहे, हे पोलिस न्यायालयासमोर स्पष्ट करतील. मात्र, फॉरेन्सिक ऑडीटच्या निष्कर्षानुसार कर्ज रकमेचा गैर विनियोग, कर्ज रकमेतून स्वतःच्या वा नातेवाईकांच्या नावावर मालमत्ता खरेदी, हेड ऑफिस इंटर ब्रँचेंस ट्रँझॅक्शन (एचओआयबीटी) वा अन्य काही कारणाने या कर्जदाराचा बँकेच्या व्यवहाराशी संबंध असावा, असे सांगितले जाते. त्याला अटक केल्याने आता अन्य थकीत कर्जदारही पोलिसांच्या रडारवर आल्याचे सांगितले जाते.
आठ जण न्यायालयीन कोठडीत
पोलिसांनी या प्रकरणी आतापर्यंत अटक केलेल्या आरोपींपैकी 8जण सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत व त्यांनी जामीनावर सुटका होण्यासाठी न्यायालयात केलेल्या अर्जांवर सुनावणी सुरू आहे. या आरोपींमध्ये बँकेचे अधिकारी प्रदीप जगन्नाथ पाटील (वय ५५, रा. सावेडी, अहमदनगर) व राजेंद्र शांतीलाल लुणीया (वय ५६, कोठी रोड, अहमदनगर), बँकेचे माजी संचालक मनेष दशरथ साठे (वय ५६, रा. सारसनगर, अहमदनगर) व अनिल चंदुलाल कोठारी (वय ६५, रा. माणिकनगर, अहमदनगर), बँकेचे माजी अध्यक्ष अशोक माधवलाल कटारिया (वय ७२, रा. टाकळी ढोकेश्वर, ता. पारनेर), बँकेचे तज्ज्ञ संचालक व सीए शंकर घनश्यामदास अंदानी (वय ४५, रा. सावेडी, अहमदनगर), बँकेचे अधिकारी मनोज वसंतलाल फिरोदिया (वय ५६, रा. आनंदपार्क, सारसनगर, अहमदनगर) व बँकेचे कर्जदार प्रवीण सुरेश लहारे (वय ४२, रा. एकनाथनगर, केडगाव, अहमदनगर) यांचा समावेश आहे.