Ahmednagar News ः मुळा धरणात सध्या 7 हजार 608 दशलक्ष घनफूट उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. शुक्रवारी 700 क्यूसेक वेगाने शेतीसाठी आवर्तन सोडण्यात आले आहे. हे आवर्तन सुमारे 30 ते 35 दिवस चालणार आहे. यासाठी तीन हजार दशलक्ष घनफूट पाणी खर्च होणे अपेक्षित आहे. जायकवाडीला पाणी सोडल्याने शेतीसाठीचे एक आवर्तन कमी झाले आहे. पुढील काळामध्ये उद्योग धंदा व पिण्यासाठीच पाणी मिळणार असल्याने शेतकरी वर्गांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. सुमारे सन 2017-18 वर्षानंतर पहिल्यांदाच मुळा धरणावर पाणी टंचाईचे संकट ओढावल्याची माहिती कार्यकारी अभियंता सायली पाटील, धरण शाखा अभियंता राजेंद्र पारखे व उपअभियंता विलास पाटील यांनी प्रभातला दिली.
दक्षिण अहमदनगर जिल्ह्याची जीवनदायीनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुळा धरणाची 26 हजार दशलक्ष घनफूट पाणी साठवण क्षमता आहे. मुळा धरणातून सोडण्यात आलेले आवर्तन टप्प्याटप्प्याने वाढवले जाणार असून ते आज शनिवारी रात्री 900 आणि रविवारी सकाळी अकराशे क्युसेक करण्यात येणार असल्याची माहिती धरण शाखा अभियंता राजेंद्र पारखे यांनी दिली.
डावा कालवा सहा ते सात दिवसांपासून बंद झाला असून तोपर्यंत डावा व उजव्या कालव्यातून शेतीसाठी सुमारे 10 हजार 548 दशलक्ष घनफूट पाणी खर्च झाले आहे. या आवर्तनामुळे राहुरी, नेवासा, शेवगाव, पाथर्डी तालुक्यातील शेतीसाठी या सिंचनाचा मोठा लाभ होणार आहे. समन्यायी कायद्यामुळे जायकवाडी ची मुळा धरणावर टांगती तलवार असल्यामुळे मुळा धरणा मधून सुमारे दोन दशलक्ष घनफूट पाणी जायकवाडीला देण्याची वेळ आली.त्यामुळे दोन्ही कालव्यांच्या शेतकऱ्यांना एकेक आवर्तनाला मुकावे लागले आहे.
मुळा धरणाच्या डाव्या कालव्याचे आवर्तन संपले असून धरणाच्या उजव्या कालव्याचे उन्हाळी आवर्तन सोडले आहे. ऐन उन्हाळ्यात मुळा धरणाच्या उजव्या कालव्यातून आवर्तन सुटले जाणार असल्यामुळे राहुरी तालुक्यासह नेवासा, पाथर्डी, शेवगाव तालुक्यातील लाभधारक शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे.